रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागरच्या समुद्रकिनारी जाळ्यात अडकलेल्या दोन ऑलिव्ह रिडले कासवांना स्थानिक तरूणांनी जीवदान दिले.
किना-यावर सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वरचापाट येथील काही तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळं समुद्रातून किनाऱ्यावर खेचत आणले. त्यामध्ये ऑलिव्ह रिडले जातीची दोन दुर्मिळ कासवं असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या दोन्ही कासवांचे पाय जाळ्यात अडकले होते, त्यामुळे त्यांना त्यातून सुटता येत नव्हतं. तरूणांनी दोन्ही कासवांची हळुवारपणे सुटका केली. त्यांच्या पायातील जाळं बाजुला केलं. त्यानंतर ते दोन्ही कासव व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर त्यांना पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आलं. ऑलिव्ह रिडले जातीची या कासवांचं वजन सुमारे 60 किलोच्या आसपास होतं. तर लांबी तीन फुटापर्यंत होती. या कासवांना जीवदान मिळालं, पण हल्ली अशा घटना वाढताना पाहायला मिळत आहेत.
कोकणच्या सुरक्षित किनारपट्टीत अंडी घालण्यासाठी जगातील दुर्मिळ अशी ऑलिव्ह रिडले जातीचं कासवं येतात. मात्र बेजबाबदारपणे समुद्रात टाकण्यात आलेली फाटकी जाळी या कासवांच्या मृत्यूस कारणीभूत ठरू लागली आहेत. जर जाळ्यातून त्यांची सुटका नाही झाली, तर प्रसंगी त्यांचा जीवही जातो. गेल्या महिन्यातही अशीच चार ऑलिव्ह रिडले कासवं जाळ्यात अडकलेली तरुणांना सापडली होती. त्यावेळी त्या कासवांची जाळ्यातून सुटका करून तरुणांनी त्यांना जीवदान दिलं होतं.