रत्नागिरी, प्रतिनिधी : लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. कंपनीच्या 7 नंबर प्लांटमध्ये हा स्फोट झाला. दरम्यान जवळपास दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान जेव्हा ही दुर्घटना घडली, ती वेळ सकाळच्या नाश्त्याची असल्याने प्लॅन्टमधील बरेचसे कामगार नाश्त्यासाठी कॅन्टीनमध्ये गेले होते. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.
लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्याच्या प्लॅन्ट नंबर ७ मध्ये आज सकाळी ८.३० वाजता अचानक रिऍक्टरचा स्फोट झाला. यामध्ये 2 कामगार जागीच ठार झाले, तर चार कामगार गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ हालचाल करत जखमी कामगारांना मुंबई ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न केले. मात्र गंभीर जखमी असलेल्या आणखी दोन कामगारांचा वाटेतच मृत्यू झाला.
घरडा रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागली असल्याचे कळताच लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कारखान्यात प्रवेश करण्यात मनाई केल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या प्रवेशद्वारावरच थांबावे लागले. कंपनी व्यवस्थापनाने स्वतःच्या अग्निरोधक यंत्रणेने सुमारे दिड तासांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले.
लोटे औद्योगीक वसाहत कामगारांसाठी दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरू लागली आहे. मागच्या आठवड्यात येथील सुप्रिया लाइफ सायन्स या कारखान्यात आग लागून तीन कामगार जखमी झाले होते. आठ दिवस उलटायच्या आतच येथील घरडा केमिकल्स या रासायनिक कारखान्यात रिऍक्टरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार
लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या कंपनीमध्ये घडलेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना कंपनीकडून प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कंपनी प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर दिली आहे.
घरडा केमिकल उत्पादक कंपनीच्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली, यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कामगार गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती समजतात रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कंपनी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येतील, तसेच जखमी असणाऱ्या कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये कंपनी देणार असल्याचं घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आल्याचं मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं.
भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे. सोबतच या ठिकाणी पोलीस यंत्रणा आपले वेगळे नियंत्रण कक्ष सुरू करेल.
हा सर्व औद्योगिक परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली यापुढील काळात राहील याबाबतही कार्यवाही करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यास सोबतच त्यांना रोजगार मिळण्याच्या बाबत कार्यवाही करण्यात येईल.
या दुर्दैवी घटनेची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून पालकमंत्री श्री अनिल परब यांनीही याबाबत माहिती घेतली.