परतीच्या प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने वाटली एक लाखांहून अधिक प्रसादरोपे
मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात जमलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या परतीच्या प्रवासाच्यावेळी वन विभागाने १ लाखाहून अधिक “प्रसाद रोपे” वाटल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्यात सध्या ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प सुरु आहे. या अंतर्गत वन विभागाने लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या संकल्पात सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यातीलच एक म्हणजे वृक्षदिंडी होय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत वन विभागाची वृक्षदिंडीही सहभागी झाली आणि त्यांनी वृक्ष विठ्ठल वृक्ष पुजा विठ्ठलाचा म्हणजेच वृक्ष लागवडीतून पर्यावरण रक्षणाचा संस्कार आणि विचार लोकमनापर्यंत पोहोचवला.
आपल्या आराध्याचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या वारकऱ्यांना वन विभागाने प्रसाद रुपी वृक्ष देण्याचे नियोजन केले होते त्याप्रमाणे पंढरपुरहून परतीच्या प्रवासाला जाणाऱ्या सर्व मार्गावर वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने १०१ स्टॉल्सची उभारणी करण्यात आल्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले की, याची सुरुवात पंढरपूर ते मोहोळ या मार्गावरील भीमा एस.टी स्थानकाजवळ झाली. पंढरपुर पुणे मार्गावर रोप वाटपाचे ११ स्टॉल उभारण्यात आले. याप्रमाणेच पंढरपुर सातारा मार्गावर १० स्टॉल, पंढरपूर कराड मार्गावर १० स्टॉल, पंढरपूर सांगोला मार्गावर १२ स्टॉल, पंढरपूर मंगळवेढा मार्गावर १२ स्टॉल, पंढरपुर मोहोळ मार्गावर ११ स्टॉल, पंढरपूर बार्शी मार्गावर १० स्टॉल, पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर १० स्टॉल, पंढरपुर-वाखरी बायबास चंद्रभागा बस स्टॉप जवळ ५ स्टॉल्स, पंढरपूर कामती मार्गावर १० स्टॉलस् ची उभारणी करण्यात आली होती. याठिकाणी वारकरी भक्तांना चिंच, सीताफळ, कडुनिंब, सिसू, बांबू, पळस, शेवगा,हादगा, पर्जन्यवृक्ष, जांभुळ, तुळशी, करंज अशा विविध प्रजातींची रोपे मोफत वाटण्यात आली.
महिला वारकऱ्यांची तुळशीच्या रोपाला तर पुरुष वारकऱ्यांची फळझाड रोपांना पसंती
पंढरपूरहून वारी करून परतणाऱ्या नगर, नाशिक, नांदेड, परभणी, सांगली, कोल्हापूर, पुण्याकडे जाणाऱ्या वारकरी भक्तांनी मोठ्याप्रमाणात रोपे सोबत नेली. एक वारकरी एक रोप याप्रमाणे ही रोपे मोफत देऊन त्याची नोंद वन विभागाच्या नोंदवहीत घेण्यात आली. यावेळी महिला वारकऱ्यांनी तुळशीचे रोप घरी नेण्याला जास्त पसंती दिल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शेतकरी बांधवांनी आवळा, चिंच, पेरु, सीताफळ, हादगा, बांबू, शेवगा या प्रजातीची रोपे नेण्यास पसंती दर्शविल्याचेही यावेळी लक्षात आले.
वृक्षदिंडी झाली संवादाचे माध्यम
वृक्षलागवडीचे बीज लोकांच्या मनात रुजवण्यासाठी, त्यांच्यात मिसळून थेट संवाद साधण्यासाठी वारी सारखे दुसरे व्यासपीठ नाही. एकाच वेळी लाखो वारकऱ्यांशी संवाद साधण्याची ही अनोखी संधी वन विभागाने ही साधली ती वृक्ष दिंडीच्या माध्यमातून. विठ्ठलाच्या नामस्मरणाबरोबर होणाऱ्या भजनात वृक्षरंग ही अनाहूतपणे मिसळला. हरित वारीसाठी पालखी मार्गावर,पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली, बियाणांच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढाकारातून स्वच्छ वारी निर्मळ वारी, हरित वारी या हा उपक्रम राबविला गेला. वन विभागाने त्यांना २० हजार कडुनिंबाची रोपे पुरवल्याची माहिती वन विभागाने दिली.
आतापर्यंत राज्यात लागली १० कोटी रोपे
३३ कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पात आतापर्यंत राज्यात १० कोटी ४० लाख रोपे लागली असून यात २३ लाख १५ हजार २८५ लोक सहभागी झाले आहेत.