रिअल इस्टेट क्षेत्रात उर्जा-कार्यक्षमता आणण्यास ‘महिंद्र-टेरी सेंटर ऑफ एक्सलन्स’ सज्ज
– भारतीय हवामानाशी अनुरुप उपाय देणारे देशातील पहिलेच संशोधन केंद्र
नवी दिल्ली : देशातील रिअल इस्टेट क्षेत्र उर्जा-कार्यक्षम असावे, यासाठी महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स लि. (एमएलडीएल) आणि द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) यांनी नुकतेच ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ हे संशोधन केंद्र स्थापन केले. अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच संशोधन केंद्र आहे. भारतात सध्या उर्जा-कार्यक्षम इमारतींची संख्या पाच टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे हरीत इमारतींच्या विकासास चालना मिळावी व रिअल इस्टेट क्षेत्राला शास्त्रशुध्द उपाय मिळावेत म्हणून सीओई संशोधन करणार आहे. अत्याधुनिक संशोधन तंत्रे, साधने व कार्यक्षमता मापन यांचा वापर याकामी होणार आहे.
तयार स्वरुपाचा आणि ऊर्जा-कार्यक्षम साहित्य व तंत्रज्ञानाचा एक सुसंगत असा ‘डाटाबेस’ यामध्ये विकसित करण्यात येणार आहे. देशाच्या गृहनिर्माण धोरणामध्ये हरीत स्वरूप, शाश्वत विकास व उर्जा कार्यक्षमता यांना प्राधान्य मिळावे, म्हणून सीओई ही संस्था केंद्र व राज्य सरकारांनाही हे आराखडे पुरवील. त्यायोगे देशातील उपलब्ध उर्जेचा सुयोग्य वापर होण्यास पाठबळ मिळेल. तसेच कार्बन डाय ऑक्साइडसारख्या वायूंमुळे होणारे प्रदूषणही कमी होईल. आराखडे सरकारला वा बाजारपेठेत सादर करण्यापूर्वी या आराखड्यांनुसार इमारती प्रत्यक्ष उभारून त्यांची चाचणी घेण्यात येईल. रिअल इस्टेट विकसक, आर्किटेक्ट्स व इतर घरमालक यांच्यापर्यंत हे आराखडे पोहोचावेत, यासाठी ते नागरिकांसाठी प्रसिध्द केले जातील.
महिंद्र उद्योगसमुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र म्हणाले, की नागरीकरणाचे भवितव्य असो, मोटार वाहतूक क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उत्पादन असो अथवा पर्यावरणातील बदलाविषयीचे कार्य, भारताला नेहमीच जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा बनण्याचा मान मिळालेला आहे. ‘महिंद्र-टेरी सीओई’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही केवळ व्यवसायाचा विचार न करता शाश्वत विकासावर काम करणार आहोत. भारतातील शहरे व गावे खर्या अर्थाने हरीत व्हावीत, याकरीता हे आमचे नागरी विकासाचे पाऊल आहे.
टेरी या संस्थेचे महासंचालक डॉ. अजय माथूर या संदर्भात म्हणाले, की खास भारतीय वातावरणाशी सुसंगत असे गृहनिर्मितीचे हरीत स्वरुपाचे, कमी खर्चाचे तंत्रज्ञान व साहित्य बनविले जाणे ही काळाची गरज आहे. यातून उर्जेचा किमान खप असलेली आणि आरामदायी जीवनशैली विकसीत करणे साध्य होऊ शकेल. महिंंद्र-टेरी सीओई या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या माहितीमुळे व ज्ञानामुळे विकसकांना स्वयंपूर्ण आराखडे बनविण्यास मदत होईल. देशात हरीत इमारती अधिक संख्येने उभारण्यात विकसकांच्या समुदायाला सीओईचे हे मोठेच योगदान ठरेल.
महिंद्र लाईफस्पेस डेव्हलपर्स या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता अर्जुनदास यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील शाश्वत नागरी विकासाचे जनक या नात्याने, चिरंतन व सर्वसमावेशक संकल्पना राबविणे ही केवळ आमचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाचीही जबाबदारी आहे. देशातील बांधकाम उद्योगात काही कल्पक व शाश्वत संकल्पना राबविण्यात ‘महिंद्र-टेरी सीओई’चे योगदान अमूल्य ठरेल. त्यायोगे आपल्याला पर्यावरणाची साखळी शाबूत राखता येईल.
‘सीओई’ने पुरवलेल्या तंत्रशास्त्रीय आराखड्यांची व्यवस्थित अंमलबजावणी, त्यांचा आढावा या देखरेखीच्या कामाचीबी जबाबदारी सीओई घेईल. उद्योग क्षेत्रातील तंत्रज्ञ व तज्ज्ञ यांची एक सल्लागार समिती याकामी नेमण्यात येईल. गुरुग्राम येथे उभारण्यात आलेल्या ‘सीओई’ला ‘एसव्हीए-गृह’पंचतारांकीत पतदर्जा मिळालेला असून येथे सर्व प्रकारच्या शाश्वत स्वरुपाच्या सुविधांची व डिझाईन्सची उपलब्धता आहे.
‘टेरी’विषयी :
द एनर्जी अॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था भारत व दक्षिणेकडील देश यथे शाश्वत विकासासंबंधीचे संशोधन करते. 1974 मध्ये स्थापन झालेली ही संस्था पर्यावरणील धोरणांची अंमलबजावणी व शाश्वत विकास यांच्यातील संशोधन, परिसंवाद यांचे आयोजन करते. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट गव्हर्नन्स’ या संस्थेकडून नावाजण्यात आलेल्या जगातील पहिल्या पाच संशोधन संस्थांमध्ये ‘टेरी’चा समावेश होतो. हवामानातील बदलांमुळे होणार्या परिणामांवरही ‘टेरी’मार्फत कार्य करण्यात येते. शाश्वत तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार्या इमारतींसाठी ‘टेरी’ तांत्रिक सल्ला देते. हरीत इमारतींना‘टेरी’तर्फे देण्यात येणार्या जीआरआयएचए (गृह) या पतमानांकनाला भारतीय राष्ट्रीय पतमानांकनाचा दर्जा आहे. कमीतकमी उर्जा वापरून पर्यावरणामध्ये अधिकाधिक भर घालणार्या, भविष्याच्या दृष्टीने सुयोग्य असणार्या इमारतींना या मानांकनामुळे प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.