मुंबईच्या मिनी गोवा किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात; प्लास्टीकचा खच, डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण
मुंबई, (निसार अली) : मुंबईच्या पश्चिमेकडे मालाडजवळ असलेल्या समुद्र किनारपट्टीवरील पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टीकचा खच आणि डांबरी गोळ्यांनी समुद्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत पत्रकार निसार अली यांचा खास रिपोर्ट…
मुंबईचा समुद्र कचरा कुंडी झाला आहे. समुद्रात तरंगणारा आणि किनार्यावर वाहून आलेला कचरा याची साक्ष देतो. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणारा मालाडजवळील परिसरही लांबच लांब किनारपट्टीने वेढलेला आहे. मार्वे, आक्सा, दानापानी, मढ, सिल्वर, मनोरी आणि गोराई हे समुद्र किनारे या भागाला लाभलेले आहेत. भारताला सात हजार किमीची किनारपट्टी लाभलेली आहे, त्या पैकीच या किनारपट्ट्या असून मीनी गोवा अशी या किनार्यांची ओळख आहे. समुद्रातून वाहून प्लास्टिकचा कचरा या किनार्यांवर येत आहे. याचा पर्यटनावर देखील परिणाम होत आहे. मढ येथे मंदिर, दरगाह, चर्च आणि किल्ला आहे. गोराईला जगप्रसिद्ध पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्ड आहे. यामुळे देशी-विदेशी पर्यटक या किनार्यांवर येत असतात. परंतु, मुलभूत सुविधांचीही वानवा आहे. प्रदूषणामुळे मासे मिळण्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षात कमी झाले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
मनोरी समुद्र किनार्यावर डांबरी गोळे
मनोरी समुद्र किनार्यावर काही दिवसांपूर्वी तेल तवंगामुळे बनलेले डांबरी गोळे वाहून आले होते. यामुळे जीवसृष्टीला आणि सागरी पक्ष्यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे संबंधित प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सागरी पक्ष्यांना धोका
समुद्रात तेल पसरल्यास त्याच्या थरामुळे सागरी पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. त्यांचे शरीर तेलाने माखल्यास त्यांना मासे पकडण्यासाठी पाण्यात उड्या मारता येणार नाहीत. त्यामुळे उपासमार होऊ शकते.
प्राणवायू पाण्यात मिसळत नाही
तेलतवंगामुळे प्राणवायू पाण्यात मिसळण्याची प्रक्रिया थांबते. यामुळे समुद्री जीव, वनस्पती यांना प्राणवायू मिळत नाही. ते तडफडून मरतात.
सागरी जीवांवर परिणाम
समुद्रातील तेल तवंगामुळे सागरी जीवांवर दुष्परिणाम होत आहे. सुक्ष्म झिंगे, खेकडे, शिंपल्या आदी प्रजातींना धोका निर्माण होतो. प्रवालींचे नुकसान होते. जे कधीही भरून निघत नाही. शिवाय दुषीत झालेले मासे मानव खात असल्यास शरिरास अपाय पोहचून जीवघेणे आजार उत्पन्न होतात.
तेलाचे थरांचे डांबरी गोळे असे निर्माण होतात
तेलाच्या थरांच्या काही अंशाचे बाष्पीभवन होते. त्याचे डांबरी गोळे बनतात. तर एका नैसर्गिक प्रक्रियेमुळेही तेलाचे पायसीकरण होते. त्याचे थेंब सागर तळाशी जाऊन त्यात सुक्ष्म वाळूकण मिसळून डांबरी गोळे तयार होतात.
एकूणच सागर जल प्रदूषणामुळे अन्नसाखळीत अडथळा निर्माण होतो. परिणामी सागरी पर्यावरण बिघडते.
प्लास्टीकमुक्त किनारे होणे गरजेचे
मालाडजवळील या किनारपट्ट्या प्लास्टीकमुक्त होणे गरजेचे आहे. प्लास्टीकची विल्हेवाट लावणे कठीण समस्या आहे. प्लास्टीकचे विघटन लवकर होत नसल्याने त्याचा पर्यावरणाला म्हणजेच सागरी जीवांना धोका पोहोचतो.
उपाययोजनांची गरज
समुद्री किनारे प्लास्टीकमुक्त होण्यासाठी उपाययोजनांची गरज आहे. स्थानिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पर्यटन विकास मंडळाने विविध उपक्रम राबवून स्थानिकांना रोजगार उपलब्ध केल्यास पर्यटन व्यवसाय या किनार्यांवर बहरेल.
खारफुटीचेही संरक्षण होणे महत्वाचे
मालाड येथे खारफुटी(कांदळवन) मोठ्या प्रमाणावर आहे. य़ा प्रकारच्या वनस्पतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होते. प्रदूषणाचे शोषक म्हणून या वनस्पती मोलाची भूमिका बजावतात. खेकडे, मासे, कोळंबीचे प्रजजन आणि अन्न देणारे स्थान म्हणून कांदळवनांंकडे पाहिले जाते. त्यामुळे खारफुटीचे संरक्षण होणे महत्वाचे आहे. या ठिकाणी कचरा आणि प्लास्टीक न टाकणे पर्यावरणाच्या दृष्टीने हितावह ठरेल. पूरापासून खारफुटी मानवाचे संरक्षण करते. 26 जुलै हा जागतिक खारफुटी दिन म्हणून पाळण्यात येतो.