गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे उदघाटन
मुंबई, (निसार अली) : कांदिवली पश्चिम येथील परिवर्तन सोसायटीमध्ये पार्वतीबाई प्रतिष्ठान सेवा संस्थेच्या वतीने सुरु केलेल्या गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्पाचे आमदार योगेश सागर व ख्यातनाम शिल्पकार चंद्रजीत यादव यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या शोहळ्यास अत्रे कट्टा संस्थापक राजेश गाडे संस्थेचे अध्यक्ष अनिल चासकर, सचिव अमित वाघ, खजिनदार सुनिता चासकर, विष्णू पेटकरसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने शिदोरी प्रकल्प, अपंग सेवा दालन या सारखे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जातात. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत गांडुळ व सेंद्रिय खत प्रकल्प सुरु करण्यात आला. आमदार योगेश सागर व शिल्पकार चंद्रजीत यादव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच प्रकल्पामध्ये गांडुळ व ओला कचरा टाकून शुभारंभ करण्यात आला. आमदारांनी सोसायटी मधील लहान मुलांना देखील खत प्रकल्पाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून मुलांच्या हस्ते ओला कचरा प्रकल्पात टाकून घेतला. संस्थेचे अध्यक्ष अनिल चासकर यांनी सदर प्रकल्पात सोसाटीमधील ओला कचरा तसेच भाजीपाल्याचा कचरा असा जवळपास आठवड्याला 200 किलो कचरा खत प्रकल्पात टाकला जाईल, यामुळे वर्षभरात पालिकेचा 10 तें 12 टन कचरा कमी करण्यासाठी हातभार लागेल असे स्पष्ट करून खत प्रकल्पाची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली
पालिकेने सोसायट्यांना कचऱ्या बाबत कडक नियम लागू केल्याने खत प्रकल्प राबवितात मात्र पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने पुढाकार घेऊन नियोजित प्रकल्प उभारला आहे. तसेच प्रकल्पासह कारले, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर,कोरपड, तुळस, पुदिना आणि कडीपत्ता अशा झाडांची लागवड केली आहे. जेणें करून रसायन मुक्त भाजीपाला मिळेल, संस्थेला सहकार्य करेन अशी ग्वाही आमदार योगेश सागर यांनी दिली
सध्या हायब्रीड आणि रासायनिक वापरामुळे नवीन आजार निर्माण झाले आहे. म्हणून बहुतांशी लोक आपल्या टेरेस गार्डनमध्ये विविध भाज्या, व फळभाज्यांची लागवड करतात. या संस्थेने नागरिकांना मार्गदर्शन करून घरच्या घरी ओल्या कचऱ्या पासून खत बनविण्याचे प्रशिक्षण द्यावे, असे ख्यातनाम शिल्पकार चंद्रजीत यादव म्हणाले.