रत्नागिरी : अजगराला जिवंत जाळण्याची घटना राजापूर तालुक्यात घडली. या प्रकाराचा सर्पमित्रांनी निषेध केला आहे. या प्रकरणी वन विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील तळवडे गावच्या कुंभारवाडीतील एका घरात अजगर शिरला. तिथल्या काही लोकांनी अजगराला पकडून त्याच्यावर गवत टाकले आणि त्याला जिवंत जाळले. अजगर आपला जीव वाचवण्यासाठी वारंवार बाहेर येत होता. मात्र, काठीच्या सहाय्याने त्याला पुन्हा जाळात ढकलले जात होते. या प्रकाराचे चित्रीकरण काही जणानी आपल्या मोबाईलवर केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. प्राणीमित्रांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी काही जणांनी वनविभागाकडे केली. राजापूर वनविभागाने गुन्हा दाखल करून अनंत जयराम हांदे, सुदेश पांडुरंग हांदे यांच्यासह संशयिताची चौकशी सुरू केली.
वन्यजीव कायद्याअंतर्गत अजगर हा क्षेणी एक मध्ये मोडतो. या गुन्ह्यासाठी कायद्यात कमीत कमी तीन वर्ष तर जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा आहे. तर दहा हजार रुपयांचा दंडाची तरतूद आहे.
अजगराला जाळण्याचा सर्पमित्र विनोद वायंगणकर निषेध केला आहे. हा प्रकार भयानक असून प्राण्याच्या बाबतीत माणसाने असंवेदना दाखवल्यासारखे आहे, असे वायंगणकर यांनी संतप्तपणे सांगितले.