पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस
* स्वस्त आणि इच्छित स्थळापर्यंत पोहचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
विकसित करणार
* एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणार
* नागपूर मेट्रोचे काम पथदर्शी, राज्यातील मेट्रोची कामे प्रगतीपथावर
नागपूर : राज्यामध्ये मुंबई , पुणे व नागपूर येथे मेट्रोची कामे वेगात सुरु असून ही कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. आगामी काळात ई-बसेस तसेच अन्य पर्यायी इंधनांचा वापर करुन प्रदूषण कमी करणारी, सर्वांना परवडेल अशी व पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
चिटणवीस सेंटर येथे केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाच्या वतीने आयोजित 11व्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचे व प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, महापौर श्रीमती नंदा जिचकार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर, जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टीन ने, सचिव दुर्गाशंकर मिश्रा, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना भेट देवून पाहणी केली. मान्यवरांच्या हस्ते हॅकेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. ‘हरित शहरी वाहतूक’ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरीकरणाचा वेग वाढत आहे. भविष्यात तो अधिक झपाट्याने वाढणार आहे. दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी नागरीकरण आता एकवटत असल्याचे आढळून येत आहे. यापुढे आपल्या शहरांचा दर्जा तेथील वाहतूक सुविधा व व्यवस्थेवर ठरणार आहे. वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ होते. ही बाब खरी आहे. यामुळे यावर उपाय शोधणेही गरजेचे आहे. यासाठी सर्वांना परवडेल अशी, पर्यावरणपूरक व श्वाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर देण्यात येत आहे.
राज्यभरात मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत मेट्रोची कामे वेगात सुरु असून नागपूर येथील महामेट्रोचे प्रकल्प पथदर्शी ठरत आहे. राज्यातील मेट्रो कॉरिडॉर अंतर्गत 570 किलोमीटर लांबीची कामे आहेत. यापैकी 400 किलोमीटरच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर 260 किलोमीटरची कामे सुरु करण्यात आली आहेत. राज्यातील मेट्रोची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
पर्यायी इंधन तसेच वाहतूक व्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, रस्ते बांधणीत क्रांती होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वांसाठी उपयुक्त ठरली पाहिजे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत समन्वय साधण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना खऱ्या अर्थाने सुविधा मिळणार आहेत. राज्यात ई-बसेस तसेच इलेक्ट्रिकवरील वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. अशाप्रकारच्या परिषदांच्या आयोजनाद्वारे वाहतूक व्यवस्थेसंदर्भात आदान-प्रदान होईल व या विचारमंथनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, देशातील शहरांमधील वाहतूक व्यवस्थेसंदर्भात विचारमंथनासाठी या परिषदेचे आयोजन नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. प्रदूषण टाळण्यावर भर देण्यात येत असून विजेवरील वाहतूक ही काळाची गरज बनत आहे. आपल्याकडे सौरऊर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याचा आपण अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. नागपूरमधील मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण असून सर्व विभागांच्या समन्वयाने ही कामे वेगात सुरु आहेत. नागपूर शहरातील काही व्यावसायिक जागा मेट्रोमार्फत विकसित करण्यात येणार असून याद्वारे नागपूर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळेल. भविष्यामध्ये ब्रॉडगेज मेट्रोच्या उभारणीद्वारे मोठे बदल घडणार आहेत. यासाठीच्या उभारणीकरिता लागणारा खर्च कमी असल्याने ही मोठी जमेची बाजू ठरणार आहे. पर्यावरणाचे संरक्षण तसेच सर्वांना परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी बायोफ्यूएल, इथेनॉल, सौरऊर्जा तसेच वीज यासारख्या पर्यायी इंधनांचा वापर करावाच लागेल. याबरोबरच आता जल वाहतुकीलाही चालना देण्यात येत आहे. डोंगराळ भागामध्ये केबल कार व रोपवे सारखे पर्याय उपयुक्त ठरु शकतात. यांनाही चालना देवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यात येत असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय नगर विकास व गृह निर्माण राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, एकंदरीतच अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरते. शहरीकरण व नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत असून शहरी वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर द्यावा लागणार आहे. वाहनांच्या संख्येतही मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याने पर्यायी इंधनाचा विचार करावा लागेल. तसेच त्यादृष्टीने वाहनांची निर्मितीही करावी लागेल. मेट्रोच्या उभारणीद्वारे नागपूरमधील शहरी वाहतूक व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होत आहेत. दिल्ली मेट्रोचाही विस्तार करण्यात येत आहे. आर्थिक, सामाजिक व पर्यावरणपूरक श्वाश्वत विकास साधण्यासाठी त्यादृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात येत असल्याचे श्री. पुरी यांनी सांगितले.
फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झिगलर म्हणाले, नागपूर हे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे शहर आहे. शहरांच्या विकासामध्ये वाहतूक व्यवस्था महत्त्वपूर्ण असते. स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था उभारण्यावर भर द्यावा लागणार असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करावी लागेल. विजेवर चालणारी विविध वाहने, सौरऊर्जा तसेच अन्य पर्यायी इंधनांचा यासाठी उपयोग करावा लागेल. या क्षेत्रामध्ये भारत व फ्रान्स परस्परांना सहकार्य करीत असून फ्रान्सच्या या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशातील व राज्यातील प्रकल्पांना बळकटी मिळणार असल्याचे श्री. झिगलर यांनी सांगितले.
जर्मनीचे राजदूत डॉ. मार्टीन ने म्हणाले, भारत व जर्मनीचे सहकार्याचे क्षेत्र विस्तारते आहे. शहरीकरणाच्या नव्या धोरणामध्ये हरित वाहतूक व्यवस्थेवर भर द्यावा लागेल. यादृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी. ही वाहतूक व्यवस्था सर्वांना परवडणारी असली पाहिजे. नागपूर मेट्रोसाठी जर्मनीचे सहकार्य लाभले असून या प्रकल्पाची उभारणी योग्य दिशेने होत असल्याचे श्री. ने यांनी सांगितले.
सचिव दुर्गाशंकर मिश्रा म्हणाले, शहरी वाहतुकीसंदर्भातील परिषदांचे आता देशातील विविध शहरात आयोजन करण्यात येत आहे. या क्षेत्रात दररोज अनेकविध नवीन घडामोडी होत आहेत. या नाविन्यपूर्ण आहेत. देशभरामधील अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे विणण्यात येत असल्याने याद्वारे नागरिकांना सुविधा होणार आहे. नागरी वाहतूक सुविधा शहर विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याने या परिषदेतील मंथन उपयुक्त ठरणार असल्याचेही श्री. मिश्रा यांनी सांगितले.
आभार मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मानले