महाज्योती’च्या संशोधकाचा ‘कॅडमियम टेलुराईड सोलर सेल’वर अनोखा अभ्यास
स्वच्छ सौर ऊर्जा स्त्रोतावर डॉ.दीपमाला साळी यांचे उपयुक्त संशोधन; माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर शोध प्रबंध
ठाणे :- जागतिक तापमानवाढ आणि ऊर्जा टंचाई या जगाला भेडसावणाऱ्या दोन प्रमुख समस्यांवर चमत्कारिक उपाय शोधण्याच्या दिशेने, मानवी बुद्धीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. अशातच आज संपूर्ण जगभरात सध्या पर्यायी इंधन आणि ऊर्जास्रोतांचा शोध आणि प्रत्यक्ष वापरासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. कारण जीवाश्म इंधनाचे मर्यादित साठे आणि त्यांच्या ज्वलनातून होणारे वायू प्रदूषण व त्यामुळे निर्माण झालेले तापमान वाढीसह अन्य गंभीर प्रश्नही आज संपूर्ण जगापुढील एक महत्त्वाची समस्या बनली आहे. भारताने अलीकडील काळात स्वच्छ ऊर्जा, पर्यायी इंधनांकडे वेगाने पावले टाकण्याचे धोरण स्वीकारले. अशातच सौर ऊर्जेचा वापर एक महत्त्वपूर्ण अशी बाब आहे. येणाऱ्या भविष्यकाळात संभाव्य विजेच्या आणि इंधनाच्या संकटावर जर मात करायची असेल तर सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करणे काळाची गरज आहे. सौर ऊर्जा हे भविष्यातील इंधन असून त्याचे पर्यावरण व अर्थव्यवस्थेसाठी असणारे फायदे अमुलाग्र आहे. सोलर सेलच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा स्त्रोतावर अनोखे शोधप्रबंध महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) च्या संशोधिका डॉ. दीपमाला प्रभाकर साळी यांनी तयार केले. कॅडमियम टेलुराइड सोलर सेल वर डॉ. दीपमाला साळी यांनी संशोधन करून माफक दरात पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मितीवर यशस्वी उपाय शोधून काढला. त्यांनी तयार केलेले हे सोलर सेल दिर्घकालीन वापरात येवू शकतात. तसेच भविष्यात औद्योगिक वापरासाठी याचा प्रयोग होवू शकतो.
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देत आहे. डॉ. दीपमाला साळी यांनी भौतिकशास्त्र या विषयातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘स्टडीस ऑन लो-रेसिटेटीव्ह बॅक कॉन्टक्ट बफर लेयर्स फॉर थीन फिल्म सीडीटीई सोलर सेल्स’या विषयावर डॉ. साळी यांनी प्रबंध सादर केले. त्यांनी तयार केलेल्या सोलर सेल मार्फत स्वच्छ सौर ऊर्जेची निर्मिती माफक दरात होऊ शकते, असे त्यांनी या प्रबंधात नमूद केले. प्राध्यापक नंदू बी. चौरे यांच्या मार्गदर्शनात डॉ. दीपमाला साळी यांनी 5 वर्षात अभ्यासपूर्ण शोध प्रबंध तयार केले. देशासह राज्याला डॉ. साळी यांचे रिसर्च उपयुक्त ठरेल यात काही शंका नाही.
साध्या उपकरणातून तयार केले सोलर सेल
‘महाज्योती’च्या नागपूरच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांच्या हस्ते डॉ. दीपमाला साळी यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. साळी यांनी सांगितले की, सौर ऊर्जा हा पर्यावरणपूरक आणि किफायतशीर स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा उत्तम पर्याय आहे. सौर पॅनल सूर्यप्रकाशातून थेट विद्युत ऊर्जा निर्माण करतात. या पॅनेलमध्ये अनेक सोलर सेल असतात, जे प्रकाश ऊर्जेला विद्युत उर्जेमध्ये रूपांत्तरित करतात. सौर पॅनलमधील सौर सेल सेमी कंडक्टर पासून बनलेले असतात, सामान्यत सिलिकॉन. परंतु सिलिकॉन सौर सेल स्थापित करण्यासाठी प्रारंभिक खर्च जास्त आहे. आपण कॅडमियम टेलुराइड सोलर सेल वर संशोधन केले. यात आपण निर्मित केलेल्या कॅडमियम टेलोराईड सोलर सेलचा खर्च अत्यंत कमी आहे. उपरोक्त सोलर सेल अत्यंत साध्या उपकरणातून केले आहे. तसेच हे सोलर सेल दिर्घकालीन वापरात येवू शकतात आणि भविष्यात या संशोधनाचा औद्योगिक प्रयोग होवू शकतो.
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून अर्थसहाय्याचे पाठबळ आणि मार्गदर्शनामुळे माझ्या संशोधनाला प्रेरणा ठरली आहे असे मनोगत डॉ. साळी यांनी व्यक्त केले. माझ्या संशोधनामधून नक्कीच सौर ऊर्जेच्या क्रांतीला एक दिशा ठरणार. डॉ. दीपमाला साळी यांनी ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांच्या सहकार्यासह वडील प्रभाकर साळी आणि आई निलम साळी यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील ‘महाज्योती’संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना लाभ होईल, असा विश्वास डॉ. दीपमाला साळी यांनी व्यक्त केले.
सौर ऊर्जेवर केलेली क्रांती कौतुकास्पद -व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले
‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज काळाची गरज असलेल्या सौर ऊर्जेची उपलब्धता कॅडमियम टेलुराईड सोलर सेलच्या संशोधनातून डॉ. दीपमाला साळी यांनी करून दिले आहे. त्यांच्या संशोधनातून माफक दरात साध्या उपकरणातून पर्यावरणपूरक सौर ऊर्जेची निर्मिती होणार. सौर ऊर्जेवर केलेली ही क्रांती कौतुकास्पद आहे. डॉ. साळी यांचे प्रबंध देशासह जगासाठी हितकारक ठरणार, अशी प्रतिक्रिया ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी दिली.
डॉ. दीपमाला साळींचे संशोधन देशाच्या प्रगतीपथावर नेणार – मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे
‘महाज्योती’च्या डॉ. दीपमाला साळी या विद्यार्थीनीने केलेले हे संशोधन अभिमानास्पद आहे. त्यांनी ‘महाज्योती’सह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे.
‘महाज्योती’कडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी हे प्रगतीपथावर गेले आहेत. ‘महाज्योती’कडून ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) व सीनियर रिसर्च फ़ेलोशिप (एसआरएफ) विद्यावेतन, अधिछात्रवृत्तीची रक्कम तसेच घरभाडे भत्ता देण्यात येत आहे. पीएचडी संशोधकांची भरीव कामगिरी ही देशाला प्रगतीपथावर नेईल, असे मनोगत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योती, नागपूरचे अध्यक्ष श्री. अतुल सावे यांनी दिले.
दिवसेंदिवस महाज्योतीचे संशोधकाचे घवघवीत यश मिळवित आहे. त्यामुळेच आज डॉ. साळी यांची कामगिरी अभिमानास्पद असल्याचेही अतुल सावे म्हणाले. तसेच पुढील वाटचालीसाठी डॉ. साळी यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), महाराष्ट्र राज्य, नागपूर प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी कळविले आहे.