मंगरूळ येथील वृक्षतोड आणि उत्खनन प्रकरणी विभागीय आयुक्तांकडून चौकशी : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. २० : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरूळ येथील गट क्रमांक ४१ ते ४९ मधील वनक्षेत्रात अंदाजे ८०० ते ९०० वृक्षतोड आणि ४० ते ४५ हजार ब्रास गौण खनिज उत्खनन झाल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्तांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनील शेळके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती
मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित क्षेत्राचे शासनाच्या वतीने पुन्हा सर्वेक्षण करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच, राज्यातील सर्व उत्खनन प्रकरणांची तपासणी नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांत संपूर्ण अहवाल तयार करण्यात येईल, असेही मंत्री श्री. बावनकुळे यांनी सांगितले.