आरे वृक्षतोडीविरोधात देशातील सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना एसएफआयही मैदानात
कोल्हापूर : मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2702 झाडं कापण्यासाठी आणि पुनर्रोपित करण्यासाठी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देण्यात आली आहे. याचा देशातील आघाडीची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)ने विरोध केला आहे. वृक्षतोड करण्यास दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी एसएफआयने केली आहे.
महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्षतोड करण्यास परवानगी दिली. समितीतील दोन वृक्षतज्ज्ञांनी आपली फसवणूक करून वृक्षतोड करण्याच्या बाजूने मत द्यावयास लावल्याचा आरोप करत शशीलेखा सुरेशकुमार आणि डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी राजीनामे दिले. तसेच आरे वृक्षतोडीच्या विरोधात ८२,००० हरकती आल्या आहेत; तरीदेखील याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून प्रस्ताव मंजूर केला. असा निर्णय जनताविरोधी असून तो त्वरित मागे घेण्याची मागणी एसएफआयने केली आहे.
पर्यावरणीय समस्या अत्यंत गंभीर बनत असताना पर्यावरणाचा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाने आणि शासनाने असा निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. भाजप-सेनेचे राज्य सरकार महाराष्ट्रभर करोडो वृक्ष लावल्याच्या जाहिराती करत आहे. त्यांच्या संवर्धनाचा विषय तर कधी चर्चेला घेतलेला नाहीच; पण अत्यंत निर्लज्जपणे सध्या अस्तित्वात असलेले वृक्ष तोडण्यासाठी परवानगी देत आहे. अशा निर्णयाचा एसएफआय तीव्र विरोध करते. या विरोधात जिल्हाभर एसएफआयच्या सर्व तालुका कमिट्यांनी विद्यार्थी वर्गाची एकजूट उभारून आंदोलन उभारण्याची हाक एसएफआयने दिली आहे.
राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, जिल्हा अध्यक्ष पंकज खोत, सचिव सर्वेश सवाखंडे, जिल्हा उपाध्यक्ष हरी आवळे, जिल्हा सहसचिव प्रेरणा कवठेकर, गौरी आंबी, प्रमोद मोहिते, केतन पाटील, गणेश भालेराव, आकाश मुंढे, स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा कमिटी यांनी आरेतील प्रस्तावित वृक्षतोडीचा तीव्र निषेध केला आहे.