रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यात सोमवारी मजगाव येथे जुनाट वटवृक्ष कोसळल्याने सहा घरांचं नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
रत्नागिरी तालुक्याला सोमवार 29 जुलै रोजी या पावसाचा फटका बसला आहे. मजगाव येथे दुपारी मोठा अनर्थ टळल्याने तेथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. तेथील भर वस्तीत जुनाट असा मोठ्या विस्ताराचा वटवृक्ष होता. हा वृक्ष पावसामुळे मुळासकट उन्मळून कोसळला.
वटवृक्ष उन्मळून कोसळताना भलामोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांची झोपच उडाली. डोळ्यादेखत वृक्ष पडताना वस्तीतील ग्रामस्थांच्या काळजाचा थरकाप उडाला. त्यापासून 6 घरांचे नुकसान झाले आहे. मात्र त्यावेळी होणारी मोठी हानी व अनर्थ देखील टळला आहे. हा वटवृक्ष बाजूला करण्यासाठी ग्रामपंचायतींने तातडीने घटनेची खबर तहसिलदार प्रशासनाला दिली. त्यानंतर पशासनाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा करण्याची कार्यवाही हाती घेतली होती