बेकायदेशीर डंपिग ग्राउंड प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचे खासदार विनायक राऊत यांना साकडे
प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी, प्रतिनिधी
लांजा कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधातील वातावरण तापलं असून या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. प्रशासनही आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी आपलं गाऱ्हाणं थेट खासदार विनायक राऊत यांच्याकडे मांडलं आहे. कोत्रेवाडी येथे बेकायदेशीरपणे होत असलेल्या या डंपिग ग्राउंड प्रकल्पाची सखोल चौकशी करून तो रद्द करण्यात यावा, यासाठी लांजा नगरपंचायतीचे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक प्रसाद डोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांची लांजा येथे भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं.
लांजा नगरपंचायत कोत्रेवाडी येथे 10 एकरात घनकचरा प्रकल्प राबवत आहे. मात्र या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे.
याबाबत प्रशासनाकडे दादही मागण्यात आली. मात्र प्रशासन आपली बाजू समजून घेण्याऐवजी प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर स्थानिकांनी आपलं गाऱ्हाणं खासदार विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मांडलं आहे. खासदार विनायक राऊत आम्हाला न्याय देतील अशी आशा आम्हाला असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे.
निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊ – खा. विनायक राऊत
दरम्यान या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे, याबाबत आपल्याला स्थानिकांनी निवेदन दिलं आहे. याची आम्ही गांभीर्याने दखल घेऊ. तसेच संबंधित जागेवर भेट देऊ आणि प्रकल्प राबवत असताना सर्वांना विश्वासात घेतलं जाईल अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.