व्यावहारिक जगाची माहिती देणाऱ्या ‘अनुभव’ कार्यशाळेत आता निसर्गभ्रमण, जैवविविधता व्याख्यान
म्हाळगी प्रबोधिनीतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच्या उपक्रमात सायबर सुरक्षेबद्दलही जागृती
मुंबई : महाविद्यालयीन विद्यार्थी हे व्यावहारिक जगाच्या उंबरठ्यावर उभे असलेले उद्याचे नागरिक असतात. आपण निवडलेल्या विद्याशाखेतील सखोल ज्ञानासोबतच त्यांना बाह्य परिस्थितीची तोंडओळख करून देणेही तितकेच महत्त्वाचे असते. अशाच प्रकारचे पूरक शिक्षण देण्याच्या हेतूने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ‘अनुभव’ या अभिनव उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील ज्ञान नैपुण्य केंद्रात दोन-दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करीत असते, ज्यामध्ये संबंधित विषयांतील तज्ञांकडून माहिती दिली जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत समाज देखरेख / समाज जोडणी कार्यक्रमांतर्गत असलेल्या या उपक्रमामध्ये आता दोन नवे पैलू जोडण्यात आले आहेत. निसर्गभ्रमण व व्याख्यानाच्या माध्यमातून आसपासच्या जैवविविधतेची प्रत्यक्ष झलक दिली जाते आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सहाय्याने सायबर सुरक्षेबद्दलही जागृती केली जाते.
मुंबईतील जैवविविधता पडद्यावर, तर उत्तनमधील निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव
अनुभव उपक्रमांतर्गत चौथ्या व पाचव्या फेरीत दिनांक ३१ जानेवारी व १३ फेब्रुवारी रोजी सुरु झालेल्या कार्यशाळेत मुंबईतील साठये महाविद्यालयातील बीएससी – आयटीचे एकूण ८० विद्यार्थी व ४ प्राध्यापक सहभागी झाले होते. यावेळी या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना प्रबोधिनीची माहिती व पुस्तकांचे गाव, भिलारची माहिती देण्यासोबतच दुसऱ्या सत्रात ‘मुंबई परिसरातील जैवविविधता’ या विषयावर एक रंजक सादरीकरण देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने बोरीवली राष्ट्रीय उद्यान, मुंबई परिसरातील खारफुटी, तुंगारेश्वर अभयारण्य, कर्नाळा अभयारण्य व माथेरानसारख्या नैसर्गिक अधिवासांच्या ठिकाणी असलेली पशु, पक्षी व वनस्पती विविधता छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आली.
तद्नंतर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या निसर्गरम्य व जैवविविधता संपन्न आवारात सदर विद्यार्थ्यांना घेऊन एक निसर्ग पदभ्रमण आयोजित करण्यात आले. या भ्रमणादरम्यान सहभागींना संस्थेच्या आवारातील विशालकाय असे पाच वडाचे वृक्ष दाखविण्यात आले. शिवाय पिंपळ, नांदृक, कांचन, बहावा, कदंब, सप्तपर्णी, ताड, तामण, आंबा, सीता अशोक, सुरमाड, करंज, फणस, जांभूळ व मुचकुंद अशी जुनी जतन केलेली व काही वर्षांपुर्वी लावलेली स्थानिक झाडे आणि बांबूची बेटे सहभागींना जवळून पाहाता आली व त्यांची माहिती देण्यात आली. तसेच, पर्जन्य वृक्ष, सोनमोहर, गुलमोहर, पिचकारी, देशी बदाम, उंदीरमार व काशीद अशा काही विलायती झाडांचीदेखील तोंडओळख करून देण्यात आली. या फेरीदरम्यान तांबट, लालबुड्या बुलबुल, नारद बुलबुल, थोरला पोपट, पांढऱ्या छातीचा खंड्या, कोकीळ, धाकटा बगळा व जांभळा शिंजीर असे पक्षीगण सुद्धा सहभागींना पाहाता आले किंवा त्यांचे कर्णमधुर आवाज ऐकता आले.
अनुभव – बाहेरच्या जगाची ओळख
अनुभवच्या चौथ्या व पाचव्या फेरीत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांतर्फे मुलांना सायबर गुन्हे, त्याला बळी पडू नये म्हणून जागरुकता व संबंधित कायदे यांबद्दल उपयुक्त माहिती देण्यात आली. मागील सहा महिने सुरु असलेल्या या उपक्रमात आत्तापर्यंतच्या पाच फेऱ्यांत साठये महाविद्यालय, कीर्ती महाविद्यालय व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानदीप अकॅडेमीचे मिळून १५ प्राध्यापक व २०० विद्यार्थी येऊन गेले आहेत. बाहेरील जगाची प्रत्यक्ष माहिती व झलक उद्याच्या या नागरिकांना या उपक्रमातून नक्कीच मिळत आहे.