हरित आणि शाश्वत स्थापत्य शैलीचा अवलंब करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली, 11 जुलै : देशभरातील वास्तुविशारदांनी हरित स्थापत्यशास्त्र अंगिकारावे आणि त्याचा प्रचार करावा, असे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती, वेंकय्या नायडू यांनी आज केले. ते म्हणाले की, सौर ऊर्जेसारख्या नूतनीकरण योग्य ऊर्जा साधनांचा प्रचार आगामी इमारत बांधणी प्रकल्पांमध्ये केला गेला पाहिजे.
भारतीय वास्तूशास्त्र संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन: ‘आयआयए नॅटकॉन 2020 – ट्रान्स्केन्ड’च्या उद्घाटन समारंभात आभासी माध्यमातून संबोधित करताना, कोणत्याही रचनेत सौंदर्यशास्त्र आणि टिकाऊपणा यांच्यात योग्य संतुलन ठेवण्याच्या गरजेबाबत उपराष्ट्रपतींनी आग्रह धरला.
सिंधू संस्कृतीपासून, कोणार्क सूर्य मंदिर ते आधुनिक काळापर्यंतच्या भारतीय वास्तुकलेच्या उत्क्रांतीचे स्मरण करून देताना नायडू म्हणाले की, आपल्या देशात अशी अनेक स्मारके आहेत, ज्यामध्ये स्थानिक साहित्य आणि तंत्र वापरून कारागिरांनी ते तयार केले होते. कोणत्याही संस्कृतीतील एक दीर्घकालीन कामगिरी म्हणून त्यांनी वास्तुकलेचे वर्णन केले.
स्वावलंबी, लवचिक आणि सर्वसमावेशक वास्तुकलेबाबत आग्रह धरीत, उपराष्ट्रपतींनी व्यावसायिकांना भारतातील वैविध्यपूर्ण संपन्न वास्तुकलेतून प्रेरणा घेण्यास सांगितले; पर्यावरणास अनुकूल असलेल्या रचना व संकल्पनांचा अवलंब करून त्यांचा वारसा पुढे नेण्यास सांगितले.
स्मार्ट सिटीज आणि ‘सर्वांसाठी घरबांधणी’ यासारख्या सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांचे कौतुक करताना नायडू यांनी या प्रकल्पांमध्ये संबंधित भागातील संस्कृती आणि वारसा वाढविण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला. त्यांनी असेही नमूद केले की स्थानिक कलाकार आणि कारागीरांचा अशा प्रकल्पांमध्ये सहयोग असला पाहिजे; यामुळे केवळ स्थानिक कलेचेच जतन, संवर्धन केले जाईल असे नाही तर, जे कारागीर त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपली स्थानिक कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा कारागीरांना रोजगार मिळेल, प्रोत्साहन मिळेल, असे ते म्हणाले.
अशा प्रकारचे प्रकल्प स्थानिक लोकांच्या गरजेनुसार सुसंगत असतील, याची खात्री करण्यासाठी, नवीन प्रकल्प तयार करताना स्थानिकांची मते आणि सूचना जाणून घेण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी वास्तुविशारदांना दिला.
कोणत्याही वास्तूची रचना करताना फॅशन आणि स्टाइलबरोबरच सोयींना प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी वास्तुविशारदांना केले. इमारतींची रचना करताना केवळ छत आणि सुरक्षा न देता, सोयी आणि सुरक्षा देण्याचे उद्दिष्ट असे पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
उपराष्ट्रपती म्हणाले की, त्यांनी नवीन इमारतींसाठी सौर ऊर्जा पॅनेल आणि पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची सुविधा अनिवार्य करण्याचा सल्ला देशभरातील महापालिका अधिकाऱ्यांना दिला होता. मुसळधार पावसामध्ये शहरांमधील पूरपरिस्थिती आणि पाणी साचण्याच्या घटनांचा संदर्भ देऊन पाण्याचा निचरा करणारी प्रभावी तयार करण्याचे मार्ग शोधण्याबाबत त्यांनी आग्रह धरला.
वाढत्या लोकसंख्येमुळे घरांच्या वाढत्या गरजा निर्माण होण्याबाबत उपराष्ट्रपती म्हणाले की, नवीन पायाभूत सुविधांसाठी जागा तयार करण्यासाठी सध्याच्या निवासस्थांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे.
कोविड–19 साथीच्या रोगामुळे सामान्य जनतेच्या जीवनावर झालेल्या परिणामांबाबत बोलताना नायडू म्हणाले की, यामुळे बांधकाम क्षेत्रावर विपरित परिणाम झाला आहे. नव्याने निर्माण होणाऱ्या घरांचे काम ठप्प झाले आहे. यासंदर्भात त्यांनी रचनाकार आणि वास्तुरचनाकार यांना याबाबत निर्माण झालेल्या समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले आहे. देशभर असलेल्या साथीच्या आजारामुळे त्याचे या क्षेत्रावरील परिणामही लक्षात घेऊन, वास्तुविशारदांनी नवीन कल्पना शोधायला हव्यात आणि रचनेबाबतच्या सीमांपलीकडे जाऊन आता विचार पुढे नेण्यास मदत केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.