मुंबई : वातावरणातील गंभीर बदल आपण सर्वजण मागील काही वर्षात अनुभवत आहोत. वैश्विक पातळीवर या बदलांना अटकाव करण्यासाठी आपली पृथ्वी म्हणजे वसुंधरा वाचवण्यासाठी पर्यावरण संवर्धन व रक्षणाकरिता आपण सर्वांनी मिळून सामुदायिक संकल्प व प्रयत्न करण्याची आज नितांत गरज आहे. आपल्या पृथ्वीचे संवर्धन व संरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात “पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जागतिक वसुंधरा दिनी म्हणजे 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिना पर्यत राज्यात विविध ठिकाणी सार्वजनिक उपक्रम राबवून वसुंधरा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
“पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा” मोहिमेची रूपरेषा खालीलप्रमाणे…
▪︎दिनांक 22 एप्रिल : पवई तलाव स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून सुरूवात. तसेच शहर,जिल्हा, तालुका, ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व इतर संस्थेत वसुंधरा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन
▪︎ दिनांक 22 एप्रिल ते 30 एप्रिल : शाळा,कॉलेज आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम
▪︎दिनांक 22 एप्रिल ते 24 एप्रिल : या तीनही दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नदी, ओढे, नाले, तलाव व समुद्रकिनारे यांची स्वच्छता करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि विविध सामाजिक संस्थाचा सहभाग.
▪︎दिनांक 25 ते 27 एप्रिल : या तीनही दिवशी Reduce-Reuse-Recycle यावर आधारित प्रयोगाचे आयोजन. यातून तीन प्रयोगाची निवड करून विजेत्यांचा सन्मान करून प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार.
▪︎ दिनांक 1 मे हा दिवस राज्यात प्रदुषण मुक्त महाराष्ट्र राज्य म्हणून साजरा करण्यात येणार.
▪︎वरील सर्व कार्यक्रमाचे उपडेट सोशल मीडियावर टाकताना
#majhivasundhara हा हॅशटग वापरून सोशल मीडियावर देखील जनजागृती करण्यात येणार.