बांबूपासून बायोफ्युएल निर्मिती हीच भारताच्या हरित भविष्याची दिशा : पाशा पटेल

नवी दिल्ली येथे आयोजित १७ व्या ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पाशा पटेल यांना प्रतिष्ठित ‘ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. यावेळी चिराग पासवान, डॉ. जितेंद्र सिंह, न्या. पी. सतशिवम, सूर्य प्रताप शाही आणि डॉ. एम. जे. खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवी दिल्लीत प्रतिष्ठित ‘ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने गौरव
नवी दिल्ली, दि. ८ जुलै २०२६ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पर्यावरण संतुलित विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना नवी दिल्ली येथे आयोजित १७ व्या ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये प्रतिष्ठित ‘ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
ॲग्रिकल्चर टुडे ग्रुप आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेत कृषी, पर्यावरण आणि शाश्वत विकास क्षेत्रातील अनेक दशकांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल पाशा पटेल यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्काराच्या मानपत्रात शेतकरी सक्षमीकरणासाठीची त्यांची अढळ बांधिलकी, शेतमालाला न्याय्य दर मिळवून देण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देणाऱ्या त्यांच्या धोरणात्मक कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पाशा पटेल यांनी बांबूपासून बायोफ्युएल निर्मिती हा भारताच्या हरित, आत्मनिर्भर आणि ऊर्जा-सुरक्षित भविष्याचा महत्त्वपूर्ण मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. बांबू हे झपाट्याने वाढणारे, कमी पाण्यावर येणारे आणि पर्यावरणपूरक पीक असून त्यापासून विविध प्रकारचे जैवइंधन तयार करता येते. त्यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल, देशाचा इंधन आयातीवरील मोठा खर्च वाचेल आणि शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीच्या पलीकडे उत्पन्नाचे नवे व शाश्वत साधन उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
बांबूच्या पर्यावरणीय फायद्यांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, बांबू मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतो. त्यामुळे हवामान बदलाच्या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी तो प्रभावी ठरू शकतो. बांबूची मजबूत मुळे जमिनीची धूप रोखतात, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात आणि ओसाड जमिनीच्या पुनरुज्जीवनास हातभार लावतात. कमी पाणी आणि कमी खतांमध्येही हे पीक चांगले वाढत असल्याने शाश्वत शेतीसाठी ते आदर्श मानले जाते.
बांबू आधारित अर्थव्यवस्था उभारण्यात यश आले तर पर्यावरण संरक्षण, स्वच्छ ऊर्जा निर्मिती, ग्रामीण रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ ही चारही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्यास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. पी. सतशिवम, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, ॲग्रिकल्चर टुडेचे संस्थापक डॉ. एम. जे. खान यांच्यासह देश-विदेशातील कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
ॲग्रिकल्चर टुडे ग्रुपतर्फे २००८ पासून दरवर्षी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. माजी सरन्यायाधीश न्या. पी. सतशिवम यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय पुरस्कार समिती तसेच तज्ज्ञ उपसमित्यांच्या शिफारशींच्या आधारे काटेकोर द्विस्तरीय निवड प्रक्रियेतून पुरस्कारार्थींची निवड केली जाते. त्यामुळे या पुरस्काराची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा देशभरात मान्यताप्राप्त आहे.
यापूर्वी राजनाथ सिंह, शरद पवार, डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि डॉ. व्ही. कुरियन यांसारख्या दिग्गज व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पाशा पटेल यांचा हा सन्मान महाराष्ट्राच्या कृषी आणि पर्यावरण क्षेत्रासाठी अभिमानास्पद मानला जात असून शाश्वत शेती, हरित ऊर्जा आणि ग्रामीण विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना नवी प्रेरणा देणारा ठरत आहे.





