वन महोत्सवानिमित्त अपना बाजार चारकोपकडून ग्राहकांना तुळशीच्या रोपट्यांचे मोफत वाटप

मुंबई, प्रतिनिधी : वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अपना बाजार, चारकोप शाखेत ग्राहक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी १ ते ७ जुलै या कालावधीत देशभर साजऱ्या होणाऱ्या वन महोत्सवाचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाची आवश्यकता याबाबत ग्राहकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
१९५० साली तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री डॉ. के. एम. मुन्शी यांनी सुरू केलेल्या वन महोत्सवाचा उद्देश नागरिकांमध्ये वृक्षारोपणाबाबत जागृती निर्माण करून पर्यावरणाचे संवर्धन करणे हा आहे. झाडांमुळे तापमान नियंत्रणात राहते, हवेचे प्रदूषण कमी होते, मातीची धूप रोखली जाते तसेच वन्यजीवांच्या अधिवासाचे संरक्षण होण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या अपना बाजार चारकोप शाखेतर्फे या निमित्ताने ५,००० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तुळशीचे रोपटे मोफत भेट देण्यात आले. या उपक्रमाला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास शाखा समितीचे अध्यक्ष प्रवीण सुखी, चिटणीस हेमंत सारंग, सदस्य घनश्याम देटके, सुमन शिगवण, शाखा व्यवस्थापक किशोर पाटील तसेच शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.





