मुंबई : समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी वॉकथॉन २०१९ चे आयोजन घाटकोपर मध्ये रविवार दि ०७ रोजी करण्यात आले होते. घाटकोपर मधील शेकडो पर्यावरणप्रेमींनी भल्या पहाटेपासून सहभाग घेतला होता. विविध घोषणा आणि फलकातून या वेळी या वृक्षप्रेमींनी झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा या विषयांवर जनजागृती केली.
घाटकोपर च्या राम कृष्ण हरी गार्डन जव्हारभाई प्लॉट मधून पहाटे सहा वाजता निघालेली ही वॉकथॉन बर्वे नगर, भटवाडी मार्गे फिरून पुन्हा राम कृष्ण हरी गार्डन पर्यंत अशी काढण्यात आली. या वॉकथॉनमध्ये विभागातील अनेक उच्चशिक्षित, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर देखील सहभागी झाले होते. प्रत्येक उपस्थित वृक्ष प्रेमींना एक-एक झाडाचे रोप देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली. मुंबईमध्ये वाढते प्रदूषण, विकासकामांसाठी होत असलेली वृक्षांची कत्तल या बाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. वॉकथॉनसारख्या कार्यक्रमातून या बाबत उपाय योजना देखील करणार असल्याचे सांगितले.
समाज प्रबोधन सेवा संघ आणि गार्डन ग्रुप चे सदस्य गार्डन स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर , योगप्रशिक्षण शिबीर असे विविध उपक्रम राबवित असून मुंबईमध्ये वाढते प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय, पर्यावरणाचा र्हास या बाबत नागरिकांमध्ये फक्त जागृती न करता प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्ही वॉकथोन आयोजित केली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी असेच उपक्रम वर्ष भर घेण्यात येणार असल्याचे या संस्थेचे संतोष सावंत आणि मधुकर साळवी यांनी माहिती दिली. या वॉकथॉन मध्ये तीनशे पेक्षा जास्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन हि वॉकथोन यशस्वी केली.