र. ए. सोसायटीमध्ये सौर उर्जा प्रकल्पाची पायाभरणी
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जिमखाना येथे योगकक्ष व ध्यानधारणा केंद्र इमारतीचे भूमीपूजन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा र. ए. सोसायटीचे अध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी केले. त्यानंतर कै. पार्वतीबाई शंकर केळकर विद्यार्थिनी वसतीगृहात सौर पॅनेल युनिटच्या कामाची पायाभरणीही केली. या विकासकामांकरिता एलआयसीने 25 लाख रुपये, उद्योजक दीपक गद्रे यांनी 20 लाख आणि सारस्वत सहकारी बँकेने 15 लाख रुपये दिले आहेत. सौर उर्जेमुळे दर महिन्याला विजेचे बिल 4 ते 5 लाखांवरून अत्यल्प येणार आहे.
व्यासपीठावर एलआयसीचे वरिष्ठ अधिकारी जगदीश्वर, शाखाधिकारी ह. धो. मासाळ, बांधकाम व्यावसायिक घनश्याम फडके, उद्योजक दीपक गद्रे, सारस्वत बँकेचे शाखा व्यवस्थापक सतीश कदम, कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, उपाध्यक्ष बबनराव पटवर्धन, अॅड. अशोक कदम, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर उपस्थित होते.
जगदीश्वर व मासाळ यांनी एलआयसीच्या सामाजिक बांधिलकीबाबत माहिती दिली. दोन महिन्यांत प्रस्ताव मंजूर झाला ही संस्थेची प्रामाणिकता व शिल्पाताईंचे कार्य यामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. उद्योजक दीपक गद्रे यांनी विद्यार्थ्यांनी सौर उर्जा क्षेत्रात पुढे यावे, असे आवाहन केले. तसेच सौर पॅनेलवरच नव्हे तर खिडकीला लावलेल्या काचांमधूनही वीजनिर्मिती होऊ शकते. अमेरिकेत चाळीस वर्षे संशोधन करणारे दोन भारतीय तरुण आता भारतात या गोष्टीचा प्रसार करत आहेत. त्यामुळे याची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊन नवनवे संशोधन करावे, असे आवाहन केले.
छोटेखानी कार्यक्रम राधाबाई शेट्ये सभागृहात झाला. त्या वेळी मंत्री नाईक म्हणाले की, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. शुद्ध हेतूने संस्था चालू झाल्याने देणगीदारांची मदत मिळते आहे. प्रामाणिक, जागरुक नागरिक घडवणे हे शिक्षण संस्थेने काम असून देशाची मदार शिक्षणावरच आहे. शिक्षण ही विकासाची चावी आहे. विद्यार्थ्यांना लागणार्या सर्व सोयीसुविधा संस्था उपलब्ध करून देत आहे. चांगला नागरिक घडवणे ही शिक्षणसंस्थांची जबाबदारी असून त्यातूनच देशाचा उत्कर्ष होतो. बुद्धीमत्तेसोबत संस्कारांची जोड असावी लागते. सुजाण विद्यार्थ्यांची पेरणी महत्वाची आहे. यातूनच कोणत्याही आव्हानांना तोंड देणारी पिढी निर्माण होणार आहे. ध्येयपूर्तीसाठी झोकून देणारे कार्यकर्ते आहेत व शुद्ध हेतुमुळेच अनेक दाते मदत करत आहेत. फक्त आर्थिक मदत नव्हे तर कार्यकर्ते लागेल ती सर्व मदत करत आहेत. जनतेचा सहभाग असतो तेव्हा कोणताही प्रकल्प यशस्वी होतो. या संस्थेत काम करताना मला सकारात्मक उर्जा मिळाली व आंतरिक बदल होत गेला.
या वेळी शिल्पाताई पटवर्धन यांनी सांगितले की, रत्नागिरी एज्युकेशन सोसासटीचे भारतात नाव आहे. बाबुराव व मालतीबाई जोशी यांनी कष्टाने उभी केलेली ही संस्था त्यांच्या आदर्शांवर पुढे नेत आहोत. कॉलेजला 75 वर्षे, शिर्के प्रशाला 60, विधी महाविद्यालय व पीजी विभागाला 25 वर्षे होत आहेत. सौर प्रकल्प व योगकक्ष इमारतीच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देणार आहोत. रणगाडा, तोफ आदी युद्धाच्या स्मृती रत्नागिरीत जतन करण्याचा मानस आहे. त्याकरिता अध्यक्ष नाईक यांचे सहकार्य लाभणार आहे.
या वेळी देणगीदारांचा सत्कार संस्था पदाधिकार्यांनी केले.
जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘हम करे राष्ट्रआराधन’ या गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. सोनाली पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह सतीश शेवडे यांनी आभार मानले. शिल्पाताई पटवर्धन अमेरिका दौर्यावर जात असून संस्थेसाठी काही ना काही देणग्या त्या आणतील. याकरिता मंत्री नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, विश्वस्त, नियामक मंडळाचे सदस्य, घटक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.