संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदीने प्रवाह बदलला
रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे कोकणात दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी जमीन खचतेय तर काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्यात. संगमेश्वर तालुक्यातील कोंड्ये-डावखोल गावावर सध्या निसर्गाचा प्रकोप पहायला मिळत आहे. निसर्गाने रौद्र रूप धारण केलं कि काय होतं, याचा अनुभव सध्या कोंड्ये आणि डावखोल येथील ग्रामस्थ घेत आहेत.
आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसानं या गावांंवर नैसर्गिक संकट कोसळलं आहे. कोसळणाऱ्या पावसानं या गावामधून वाहणाऱ्या नदीने प्रवाहच बदलल्याने नदी थेट भात पिकांच्या शेतातून वाहत आहे. त्यामुळे जवळपास २०० एकर भात जमीन धोक्यात आली आहे. पावसाचा जोर कमी होवून देखील सध्या नदीचा बदललेला प्रवाह तसाच आहे. ज्या वेळेला धो धो पाऊस कोसळत होता त्यावेळी नदीनं बदलेल्या प्रवाहाचं रौद्र रुप काहीजणांनी मोबाईच्या कॅमेऱ्यात कैद केलं, ही दृश्य पाहिली की अंदाज येतो की केवढा मोठा प्रवाह या नदीला होता.
भातशेतीची नुकतीच लावणीची कामं झाली होती. पावसामुळे पीकही तरारू लागली होती. अशातच अतिवृष्टीमुळे नदीचा मूळ प्रवाह बदलला गेला आणि भातशेतीची वाताहत झाली. भात हे गावातील मुख्य पिक, पण आता शेतातूनच थेट नदी वाहू लागल्याने खायचं काय असा मोठा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांच्या मनात सतावत आहे. पंचनामे झालेत पण अजून नुकसानीची भरपाई इथल्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे योग्य नुकसान भरपाई मिळावी आणि या नदीतील गाळ उपसला जावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असल्याचे कोंडये गावच्या सरपंच पूनम देसाई आणि डावखोलच्या सरपंचांनी सांगितलं आहे.