तब्बल 800 पुस्तके, 120 वह्या वापरून साकारला पर्यावरणस्नेही ‘ज्ञानगणेश’; मालाडमध्ये रायपाडाचा राजाचा उपक्रम
मुंबई, (निसार अली) : गणेशोत्सव पर्यावरणस्नेही होऊन समाजात पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी आणि वाचन संस्कृती वाढावी, यासाठी मालाड पश्चिमेतील रायपाडा मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. तब्बल
800 पुस्तके आणि 120 वह्या यांचा वापर करत मंडळाने गणपतीचे रूप साकारले आहे. दहा वर्षांपासून पर्यावरणस्नेही मुर्त्या साकारून मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहेत.
यंदा पुस्तक, वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर, गिरमिट आदी शालेय साहित्याचा वापर करून गणेशाचे रूप साकारले आहे.
आकार आर्टस् चे सिद्धांत नाईक यांची ही कल्पना आकारास आणली आहे. महिनाभर 8 ते 1O कार्यकर्त्यांच्या मदत त्यासाठी घेण्याचे आली आहे. पुस्तकरूपी ज्ञानगणेश साकारण्यामागे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवणे हा उद्देश आहे, असे मंडळाकडून सांगण्यात आले.
नुसतंच देखावा न करता प्रत्यक्ष स्वतःपासून सुरुवात करून समाजात संदेश देणे तसेच अनंत चतुर्थी नंतर या पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचे निमित्त साधून आम्ही पुस्तके वाचा आणि मोबाईलचा वापर मर्यादित करून निरोगी व्हा, असा संदेश समाजात देणार आहोत, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संजय तुलसणकर व नितीन जाधव यांनी दिली .
– गेल्या वर्षी मंडळाने कागदी लगद्याची गणपती मूर्ती साकारला होती.
-विशेष म्हणजे कोणता ही रंग, माती किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, अशा साहित्याचा वापर गणपती साकारताना केला आहे. पर्यावरणस्नेही वातावरण व समाजात वाचन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न आहे.
-पुस्तके, वह्या, पेन्सिल, पट्टी, पाटी चा वापर केला गेला आहे.
– पर्यावरण रक्षण व वाचन संस्कृती टिकवणे या विषयावर लघुपटही मंडळाच्या वतीने दाखवण्यात येणार आहे.