पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान; सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग
पालघर : २६ जुलै हा दिवस जागतिक कांदळवन दिन म्हणून पाळण्यात येतो. या निमित्त विद्यार्थ्यांना कांदळवन किंवा खारफुटीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व समजावे, या उद्देशाने पालघरमधील शिरगावात कांदळवन स्वच्छता अभियान राबविण्यात आली. प्राणीशास्त्र विभाग, सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि कांदळवन कक्ष, पालघर यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. विद्यार्थी-विद्यार्थीनींनी कांदळवनांतून 3 पोती प्लास्टिकचा कचरा बाहेर काढला.
कांदळवन कक्षातर्फे अधिकारी केळुसकर मॅडम आणि मॆन्ग्रुव्ह फाऊंडेशनच्या कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांना कांदळवृक्षांची ओळख आणि त्यांचे महत्त्व, त्यांच्या विविध जाती आणि समुद्री पर्यावरण राखण्यास, सुनामी आणि पूर यावेळी कांदळवने कशाप्रकारे भूमिका पार पाडतात यांची माहिती दिली. कांदळवनांमध्ये आढळणारे विविध प्राणी पक्षी याबाबतही सांगण्यात आले.
कांदळवन कक्षाच्या अधिकारी केळुसकर मॅडम आणि त्यांचे सहकारी तसेच वनविभागाचे अधिकारी अमोल आंग्रे,जाधव, शिरगाव गावच्या सरपंच चिन्मयी मोरे या देखील उपस्थित होत्या. सहभागी विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक स्वप्निल केणी, प्रा. श्रुती दळवी, प्रा. पूजा किणी, प्रा. भूषण भोईर आणि प्रा. अनुजा देसले उपस्थित होते.
खारफुटीच्या झाडांची वाढ होणे गरजेचे आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. त्यानुसार आम्ही काम सुरू केले आहे, असे प्रा. भूषण भोईर यांनी सांगितले.