मूर्ती प्रशिक्षणातून शाडू मातीचा संस्कार रुजविणारे ‘देव’
ठाणे । पर्यावरणस्नेही पिढी निर्माण व्हावी, यासाठी ठाण्यातील देव दाम्पत्य कार्यरत आहेत. त्यासाठीच गणेशोत्सवाच्या आधी ते शाडू मातीने गणेश मूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेतात. बालवयातच शाडू मातीचे संस्कार रुजल्यास पर्यावरणस्नेही पिढी निर्माण होण्यास मदत होईल आणि गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा होईल, असा देव यांचा प्रयत्न आहे. या कार्यशाळेची नुकतीच दशकपूर्ती झाली, त्या निमित्त हा विशेष लेख…
प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीमुळे पर्यावरणाची हानी होते. यावर उपाय शाडू मातीच्या मूर्तीचा पर्याय पुढे आला आहे. शाडू मूर्ती बनविल्यास पर्यावरणाचे संवर्धनही होते, या उद्देशाने उच्चशिक्षित असलेल्या मूर्तिकार मंदार देव यांनी दहा वर्षांपूर्वी शाडूतून गणेश मूर्ती साकारण्याची कार्यशाळा सुरू केली. मंदार यांची पत्नी प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कीर्ती देव याही या कार्यशाळेत प्रशिक्षण देत आहेत.
लहान मुलांसोबत सर्वच वयोगटातील व्यक्ती या कार्यशाळेत सहभागी होतात. गणेशोत्सवाच्या आधी काही दिवस ही एकदिवसीय कार्यशाळा होते. शाडू मातीतून ‘श्री’ चा आकार साकारणे याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाते. यातूनच मग कल्पना शक्तीला आकार देत शाडू मातीचा संस्कार आपोआप रुजण्यास मदत होते. तयार मूर्ती सुकल्यावर त्यावर रंगकाम करून गजाननाचे मनमोहक रूप तयार होऊन मन प्रसन्न होऊन जाते.
शाडूपासून मूर्ती तयार होतानाचे फायदे, याबाबत आयुर्वेदाचार्य कीर्ती देव यांनी दिलेली महत्वपूर्ण माहिती : ओली भिजवलेली शाडू माती मुलायम असल्याने,त्याच्या स्पर्शाने शरीरातील उष्णता कमी होते. पित्ताचा त्रास असणाऱ्यांना गुणकारी आहे. हस्त व नेत्र यांत सुसंवाद होतो. अंत:प्रेरणेची सोबत मिळते. बालकांच्या विकासप्रक्रियेत सकारात्मकता निर्माण होते. शाडू मातीपासून मूर्ती तयार करताना लहान मुलांचे चंचल मन स्थिर होते. प्रयोगशीलता म्हणून याकडे पहावयास हवे. मानसिक स्वावलंबीपणा प्राप्त होतो. शाडू मूर्ती सुकली की त्यावर तेजस्वी रंग देताना एकाग्र चित्त होऊन बुद्धीला चालना मिळते. शांत रंग दिले की मन शांत होते. कुटुंबातील सर्व सदस्यांचा रंग कामात सहभाग असल्यास गणपतीपुढील कुटुंबातील सुसंवाद व एकोपा वृद्धींगत होतो. यामुळे आपोआपच सुदृढ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते.