मुंबईच्या पश्चिम उपनगरांना कांदळवनांचे कवच; ३८ हेक्टर क्षेत्रात कांदळवन उद्यानाची लवकरच निर्मिती
मुंबई : नागरी वस्त्यांचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करणाऱ्या कांदळवनांचे मुंबईच्या पश्चिम उपनगरांना नैसर्गिक कवच प्राप्त होणार आहे. त्यासाठी ३८ हेक्टर क्षेत्रात दोन कांदळवन उद्यानाची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी गोराई येथे ८ हेक्टर क्षेत्रावर २६.९७ कोटी रुपये खर्चून तर दहिसर येथे ३० हेक्टर क्षेत्रावर ४८.८० कोटी रुपये खर्चून कांदळवन उद्यान विकसित केले जात असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
गोराई कांदळवन
गोराई कांदळवन उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, पक्षी निरीक्षण मनोरा, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन, यासारखी कामे प्रस्तावित असून २०२१ च्या दीपावलीच्या आधी हा प्रकल्प पर्यटकांसाठी उपलब्ध होईल यादृष्टीने नियोजन करण्यात जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
दहिसर कांदळवन
दहिसर कांदळवन उद्यानाला प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कांदळवनाची जैवविविधिता खुप मोठी असून येथे कांदळवनाच्या ११ प्रजाती आढळतात. त्यामुळे संशोधन आणि मनोरंजन या दृष्टीने हा परिसर पर्यटकांसाठी आणि अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. येथे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. या उद्यानात निसर्ग परिचय केंद्र, मँग्रो ट्रेल, जैवविविधतेसह आभासी संग्रहालय, स्थानिकांमार्फत होडी पर्यटन यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत. राज्य योजनेतून हा प्रकल्प राबविला जात असून ऑक्टोबर २०२२ पर्यंत हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवने
राज्यात एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कांदळवने असून यात १७ हजार हेक्टर क्षेत्र हे शासकीय मालकीचे तर १३ हजार हेक्टर क्षेत्रावरील कांदळवने खाजगी जमीनीवर आहेत.