असा साजरा केला 100 टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव : साकारला फळ-भाज्यांतून बाप्पा; ‘उम्मीद’चा आदर्शव्रत उपक्रम
मुंबई, (निसार अली) : 100 टक्के पर्यावरणस्नेही गणेशोत्सव कसा साजरा करावा, याचा आदर्शच मालवणीतील उम्मीद फाऊंडेशनने सर्वांसमोर आखून दिला आहे. उम्मीदने फळ-भाज्या यांचा वापर करत मनमोहक बाप्पा साकारत गणेशोत्सव साजरा केला.
उम्मीद फाऊंडेशन वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम मालवणीसह मुंबईत राबवते. यंदा उम्मीदच्या सलमा मेमन यांनी पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. समाजात जातीय सलोखा व पर्यावरण बचावचा संदेश देण्यासाठी फळ-भाज्यांचा उपयोग करून गणेश मूर्ती साकारली. दीड दिवसाच्या गणपतीची विधिवत आरती करून एक बादली पाण्यात विसर्जन करून ते पाणी वृक्षांना घालण्यात आले. काकडीसारख्या फळांचा प्रसाद बनवून वाटप केले. तसेच भाज्या खत निर्मितीसाठी देण्यात आल्या. पर्यावरणाचा ऱ्हासही टळला व सण ही साजरा झाला.
साजिद बुखारी, आशिष हलदार, अरबाज अन्सारी, आमरीन पटेल आदींनी पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य केले.
“आमचा उद्देश समाजात सामाजिक सलोखा जपणे आणि पर्यावरण स्नेही उत्सव साजरा करणे हा आहे.” – सलमा मेमन, संस्थापक, उम्मीद फाऊंडेशन