आदिवासी पाड्यांत ‘कायदा तुमच्या दारी’; एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी राबविली मोहीम
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या डीएलएलईअंतर्गत एलएलएम पर्यावरण विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांत कायद्याबाबत जनजागृती केली. महिलांना स्व-संरक्षणाचे धडेही देण्यात आले.
यावेळी स्टार चॅरिटीज आणि सुयश फाऊंडेशनही सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठ विधी विभाग, डीएलएलई विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यांत प्रत्यक्ष भेट देऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले.
आदिवासी पाड्यांत ‘कायदा तुमच्या दारी’ हा उपक्रम मुंबई विद्यापीठाच्या विधी विभाग प्रमुख डॉ. प्रा. राजेश्री वऱ्हाडी तसेच डॉ. प्रा. संजय जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार राबविण्यात आला. मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज यावेळी उपस्थित होता. स्टार चॅरिटीज आणि सुयश फाऊंडेशननेही उत्स्फूर्त सहभाग यावेळी नोंदवला. आदिवासी पाड्यात शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे आहे. बेरोजगारीची समस्या आहे, व्यसनांपासून दूर कसे रहावे, कायदा म्हणजे काय?, कायद्याचे पालन कसे करावे? यावर विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं. मलापाडा, नवापाडा आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. सुयश फाऊंडेशनचे प्रमुख प्रदीप कांबळे आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य मिळाले. स्टार चॅरिटीजने जनजागृती केली.
विद्यापीठाच्या डीएलएलई अंतर्गत एलएलएमच्या पर्यावरण विभागातील विद्यार्थी आम्रपाली मगरे, उदय गायकवाड, पूनम सिंग, प्रशांत गायकवाड, शीतल बने, हिना वोरा, श्रीकांत वैद्य, आदित्य पाटील, संदीप भोईर, सुमित सोनारे, मोहन जाधव, अभिजित कासार उपस्थित होते. तसेच प्रथम वर्ष एलएलएमची विद्यार्थीनी आष्मा आश्रफि हिनेही सहभाग नोंदवला.
महिलांवर अत्याचार वाढत आहेत. यासाठी एलएलएमचे विद्यार्थी कराटेपटू मोहन जाधव यांनी महिलांना स्व-संरक्षणाचे धडे दिले. यावेळी स्व-संरक्षण कसे करावे याची प्रात्यक्षिके करण्यात आली. पूनम सिंग, प्रशांत गायकवाड, आम्रपाली मगरे, संदीप भोईर, हिना व्होरा, उदय गायकवाड, अभिजित कासार यांनी विशेष मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांसाठी सुयश फाऊंडेशनकडून अभिनव विद्यालयात चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
वनपाल मनोज पाटील यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. इयत्ता पहिली ते नववीतील 300 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे साहित्य वाटप स्टार चॅरिटीजकडून करण्यात आले.