निसर्ग जपला तरच शाश्वत विकास शक्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 5- वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करावी लागणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो याचे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. विकास हा झालाच पाहिजे परंतु तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. त्यानुसार वसुंधरेची जपणूक करण्याचा आपला जुना संस्कार नव्याने रूजविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणाले, विकास कशाला म्हणावे याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण निसर्ग आणि त्यातील वन्यजीव जपत पुढे आलो आहोत, यांची उपयुक्तता लक्षात घेता हा वारसा पुढे नेण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. झाडांपासून मिळणाऱ्या प्राणवायूची निकड कोविड काळात सर्वाधिक जाणवल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईसारखी समृद्ध वन्य जीवसृष्टी असलेले शहर जगात अन्यत्र कुठेही नाही याचा उल्लेख करून पर्यावरण रक्षणासाठी आज होत असलेल्या कामांची फळे कदाचित आता दिसणार नाही, तथापि पुढच्या पिढीला याचा निश्चित लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे, माझी वसुंधरा अभियान हे असेच आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा- अजित पवार
कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते, असे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे 200 कोटी रूपयांचा निधी दिला जाईल, असे जाहीर केले. या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाद्वारे पर्यावरण रक्षणासाठी काटेकोर उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
राज्यात पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनांचा भाग म्हणून एसटी महामंडळाअंतर्गत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रीक वाहने घेण्यात येणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. याची सुरूवात नुकतीच करण्यात आली आहे. वातावरणीय बदलांमुळे अनेक संकटे येत आहेत, याबाबत सर्वांनीच दक्षता घेण्याची वेळ आली आहे. प्रसारमाध्यमांनी देखील याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणपूरक बाबी बिंबविण्यासाठी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावा असेही ते म्हणाले. माझी वसुंधरा 2.0 अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या संस्था आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पंचतत्वाच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा असावी या उद्देशाने यापुढे त्यांच्या प्रत्येक कामासाठी गुण देऊन उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा सत्कार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण आणि पर्यटन हे दोन्ही विभाग उत्कृष्ट काम करीत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
स्वच्छता ही संस्कृती बनावी- बाळासाहेब थोरात
स्वच्छता, माझी वसुंधरा हे अभियान ही केवळ रोज राबविण्याची बाब नाही तर ती जनमानसात रूजून आपली संस्कृती बनली पाहिजे, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मागील दोन वर्षांच्या कठीण काळात सर्वच अधिकाऱ्यांनी प्रत्येक विभागात केलेल्या उत्कृष्ट कामाचे मोजमाप करता येणार नाही. पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे ही आनंदाची बाब असून अशाच इतरही चांगल्या कामाची जाणीव सर्वांना झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. पर्यावरण, पर्यटन या विभागांमध्ये चांगली कामे होत असल्याचे सांगून त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. पुढील वर्षी पारितोषिकांचा हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात घ्यावा, असे ते म्हणाले.
‘इज ऑफ लिव्हिंग’साठी काम करायचे आहे- आदित्य ठाकरे
पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी मनोगताद्वारे व्यक्त केले. ग्रीन ग्रोथ हे केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर रोजगार निर्मिती आणि आर्थिक चक्र गतिशील राहण्यासाठी देखील आवश्यक असल्याचे ते म्हणाले. माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पंचतत्वाच्या रक्षणासाठी काम होत आहे. याकामामध्ये मंत्रिमंडळापासून गाव पातळीपर्यंत सर्वांचे पाठबळ आणि सहकार्य लाभल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
नुकत्याच डावोस येथे झालेल्या परिषदेत गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात होता, हा जागतिक पातळीवर होत असलेला मोठा बदल असून राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन यामुळे देशाला प्रगतीची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवी दिशा दाखवणारे काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकाद्वारे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी माझी वसुंधरा अभियानाच्या दोन टप्प्यांची माहिती देऊन या अभियानाच्या वाटचालीचा आढावा घेतला. एबीपी माझा चे संपादक राजीव खांडेकर यांनी राज्यात पर्यावरणाबाबत होत असलेली जागृती कौतुकास्पद असून हे काम देशाला दिशादर्शक असल्याचे सांगितले. सकाळ चे संपादक सम्राट फडणीस यांनी या अभियानाला माध्यमांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर, टाइम्स ऑफ इंडियाचे पार्थ सिन्हा यांनी देखील यावेळी बोलताना मानवाला राहण्यासाठी एकच पृथ्वी अस्तित्वात असल्याने तिला जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.
माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत विविध पातळ्यांवर उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि अधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये अमृत शहरांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अभिजित बांगर, उत्कृष्ट विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे, उत्कृष्ट जिल्हाधिकारी पातळीवरील पुरस्कार राहुल रेखावार, कोल्हापूर, उत्कृष्ट जिल्हा परिषद पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि आशिष येरेकर, अहमदनगर आदींसह विविध संस्था आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावेळी शालेय शिक्षणामध्ये प्रगतीसाठी शासन आणि सीईडब्ल्यू तसेच युनिसेफ यांच्यादरम्यान सामंजस्य कराराची देवाणघेवाण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय भुस्कुटे यांनी केले.