पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन
रायगड जिमाका दि.12:-कोकणामध्ये होळी या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात होळीसाठी वृक्ष तोड न करता केरकचरा, सुका पाळापोचाळा जाळून होळी साजरी करावी. कोणतीही वृक्षतोड करु नये तसेच कोणत्याही प्रकारे वन्यप्राण्याची शिकार करु नये. तसेच पर्यावरणपुरक होळी साजरी करावी,असे आवाहन उपवनसंरक्षक रायगड अलिबाग राहुल पाटील यांनी आवाहन केले आहे.
वृक्षाचे घनदाट जंगल असलेल्या शहराचे स्वरुप आजघडीला काँक्रिटीकरणाचे जंगल असेच काहीसे झाले आहे. शहराच्या वाढत्या व्याप्तीमुळे सर्रासपणे वृक्षतोड केली जात असून यामुळे पर्यावरणाला मात्र मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचत आहे.
भारतीय वन अधिनियम, 1975 च्या तरतुदीनुसार पूर्वपरवानगिशिवाय कोणतेही झाड तोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्षात अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. अवैधरित्या वृक्षतोड केल्यास प्रत्येक गुन्ह्यासाठी 1000 ते 5000 रुपये दंड, तसेच एक आठवडा ते एक वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तोंडावर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर होळी जाळण्यासाठी लाकूड हवे म्हणून ठिकठिकाणी सर्रासपणे वृक्षतोड केली जात असते. तसेच प्रामुख्याने सावर जातीचे वृक्षांची अवैधपणे वृक्षतोड केली जाते.
यासाठी एकीकडे वनविभाग, प्रशासन तसेच विविध विभागाद्वारे वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मात्र अनधिकृतपणे होणाऱ्या या वृक्षतोडीकडे होणारे दुर्लक्ष पर्यावरणाला अत्यंत मारक ठरणारे आहेत. तसेच अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून अनेक प्रकारे नैसर्गिक आपत्ती येत आहे व त्यामुळे आपले सर्वांचेच नुकसान होत आहे. तसेच होळीत अनेक ठिकाणी गोवऱ्या, लाकडे जाळली जातात. या प्रकारामुळे प्रदूषणातही भर पडते. परिणामी, पर्यावरणालाही धोका पोहोचतो. धार्मिक महत्व असल्याने याबाबतही नागरिकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध मंडळांनी एकत्र येऊन सार्वजनिकरित्या एकाच ठिकाणी होळी करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.