रत्नागिरी, (आरकेजी) : गुहागर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या 4 कासवांना तेथील स्थानिक तरूणांनी जीवदान दिले. चारही कासवं नुकतीच किना-यावर जाळ्यात अडकली. सकाळी समुद्र किना-यावर फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या प्रसाद कचरेकर, चिन्मय कचरेकर, अलकेश भोसले, दीप कचरेकर आणि अमोल नरवणकर या तरूणांना जाळ्यात काहीतरी अडकल्याचं दिसले. त्यांनी ते जाळे समुद्रातून किना-यावर खेचत आणले तर त्यामध्ये कासव असल्याचं निदर्शनास आले. त्या कासवांचे पाय जाळ्यात अडकले होते. त्यांना त्यातून सुटता येत नव्हते. या तरूणांनी चारही कासवांच्या पायातील जाळं बाजुला केले आणि या कासवाला कुठे जखम वैगरे झालीय का याची पहाणी केली आणि त्यानंतर त्यातील तीन कासवांना पुन्हा समुद्रात सोडून दिले. र एका जखमी कासवाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. ऑलिव्ह रेडली या जातीची हे चारही कासव होती त्याचं वजन सुमारे 60 किलोच्या आसपास होतं तर लांबी तीन फुटापर्यंत होती. गुहागर येथील किनारपट्टीवर फिणा-या या तरूणांनी या चारही कासवांना जीवदान दिले..कोकणच्या किनार पट्टीत मोठ्या प्रमाणावर अंडी घालण्यासाठी जगातील दुर्मिळ ऑलिव्ह रेडली जातीचं कासवं येतात. ही चारही कासवं मच्छिमार यांनी लावलेल्या जाळ्यात अडकली व वाहत ती गुहागरच्या किनाऱ्यावर लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.