शून्य कचरासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करणारा उद्योजक
अंबरनाथ । कचऱ्याची तीव्र समस्या मोठ्या शहरांना भेडसावत आहे. शून्य कचरा मोहीमही राबविण्यात येत आहे. जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गृहनिर्माण सोसायट्यांनी खत निर्माण करावे, असा प्रयत्न महापालिका करत आहेत. यासाठी अंबरनाथ येथील अनिकेत गायकवाड या उद्योजकाने वेस्ट कन्व्हर्टर मशीन तयार करण्याचा वसा घेतला आहे.
मुंबईसारख्या शहरातील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता जवळ जवळ संपली आहे. पालिकेला मुंबईबाहेर डम्पिंग ग्राऊंड शोधत फिरावे लागत आहे. कचरा व्यवस्थापन अंतर्गत शून्य कचरा मोहीम गृहनिर्माण सोसायट्यांसाठी राबविण्यात येत आहे. याच कचरा समस्येवर मात करण्यासाठी वेस्ट कन्व्हर्टर मशीन उपयोगी पडतील असे अनिकेत यांचे म्हणणे आहे.
अशा प्रकारे मशीन कार्य करते
वेस्ट कन्व्हर्टर मशीनमध्ये ओला कचरा टाकला जातो. यानंतर कचरा बारीक होतो. कचरा बाजूला काढून एका ट्रे मध्ये ठेवला जातो. त्यावर बायोकुलम नावाचे एक रसायन फवारले जाते. त्यांनतर आठ दिवसांनी खत तयार होते.
मशीनसाठी फक्त 2.5 feet बाय 2.5 feet जागा लागते. दिवसाला 800 किलो ओला कचरा अतिसूक्ष्मपणे बारीक करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे. मशीनची क्षमता 1.5 hp आणि 3000 rpm इतकी आहे. या मशीनची किंमत 90 हजार इतकी आहे.
मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी 10 hp आणि 3000 rpm अशी गिअरबॉक्ससह मशिन तयार करण्यात येते, मशीनची किंमत साडेचार लाख इतकी आहे.
“शून्य कचरा मोहिमेसाठी मशीनच घ्या, असे मी सांगणार नाही. शून्य कचरासाठी इतर पर्यायही उपलब्ध आहेत. पालिका आणि सोसायट्या यांनी त्यासाठी आग्रही असले पाहिजे.” – अनिकेत गायकवाड