पर्यावरण दिन विशेष लेख; शेवटची घंटा/वाया घालवायला वेळच उरलेला नाही : रामनाथ वैद्यनाथन,
ओळख: जागतिक पर्यावरण दिन २०२२ रोजी सर्व हितधारकांनी संपूर्ण जगाची शाश्वत विकास उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठीची निकड लक्षात घेऊन नव्या जोमाने काम करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे.
रामनाथ वैद्यनाथन, जीएम आणि हेड – एन्व्हायरन्मेंटल सस्टेनेबिलिटी, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि संबंधित कंपन्या
^^^^
भारतात गेल्या कैक वर्षानंतर यंदाचा मार्च महिना सर्वात जास्त तापलेला होता. एरव्ही सहन करता येईल इतपत ऊन आणि तसा आरामदायीच म्हणावा अशा मार्च महिन्यात या वर्षी मात्र १२२ वर्षांनी उष्णतेच्या तीव्र लाटेचा विक्रम रचला गेला. पृथ्वीच्या आधीच कमजोर पडलेल्या पर्यावरणावर हवामानातील बदलांचा ताण वेगाने वाढत असल्याचे पुन्हा एकदा जाणवून देणाऱ्या या परिस्थितीचे चटके आपणां सर्वांना सहन करावे लागले.
वेळ हातातून निसटत चाललेली असताना ५ जून रोजी येणारा जागतिक पर्यावरण दिन म्हणजे आपल्या अस्तित्वावरच टाच देऊ पाहत असलेल्या संकटाचे निवारण करण्यासाठी आपल्या कृतींचा (नुसती वचने नाही) वेग वाढवण्याची अजून एक संधी आहे. जागतिक पातळीवरील सर्व धोरणांची सुरुवात, मध्य आणि शेवट हवामानातील बदलांच्या मुद्द्याने व्हायला हवा. भविष्यातील परिणाम कमीत कमी व्हावेत, संभाव्य नुकसान टाळले जावे यासाठीच्या सर्व एकत्रित प्रयत्नांचा केंद्रबिंदू हवामानातील बदल हा मुद्दा असायला हवा.
एक ग्रह म्हणून आपण सर्वजण किती मोठ्या धोकादायक स्थितीमध्ये आहोत हे समजून घेण्यासाठी काही संदर्भ जाणून घेऊ या. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डाय ऑक्साइडच्या दर महिन्यातील सर्वाधिक पातळीने २०१९ मध्ये प्रति मिलियन ४१४.८ पार्ट्सचा टप्पा पार केला, गेल्या तीस लाख वर्षांतली ही कमाल पातळी होती. म्हणजेच याआधी इतका जास्त कार्बन डाय ऑक्साइड जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात जमा झाला होता तेव्हा होमोसेपियन्स (पाषाणयुगातील मानव) ही प्रजातीच अस्तित्वात नव्हती.
कल्पना करायला जरा कठीण जातंय का? ठीक आहे, आता परिस्थिती आपल्या सहज डोळ्यासमोर येईल असे एक उदाहरण पाहू. गेल्या तीन वर्षात हवामानाच्या बाबतीत घडलेल्या विपरीत घटनांची प्रचंड मोठी आकडेवारी जर पहिली तर आपल्या सध्याच्या दैनंदिन आयुष्यावर हवामानातील बदलांची कुऱ्हाड कधीही आणि किती जोराने येऊन नासधूस करू शकते हे सहज लक्षात येईल. २०२१ मध्ये विक्रमी उच्च तापमानामुळे चीन आणि युरोपमध्ये पूर आले, कॅलिफोर्निया (यूएस), रशिया, टर्की आणि ग्रीसमध्ये जंगलांमध्ये महाभयानक आगी लागल्या, उपोष्णकटिबंधीय दक्षिण अमेरिकेत दीर्घकाळापर्यंत दुष्काळ पडला. २०१९ आणि २०२० मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जंगलांना लागलेल्या महाप्रचंड आगी आणि ग्रीनलॅन्डमधील प्रचंड ग्लेशियरसह आर्क्टिक हिमथर वितळण्यासारख्या घटना हवामान आपत्ती प्रत्यक्षात आपल्या किती जवळ येऊन ठेपल्या आहेत ते ठळकपणे दर्शवतात.
थोडक्यात सांगायचे तर, हवामानातील बदल हे आता केवळ एक संकट उरलेले नाही; तर भयावह रूप धारण केलेली आणीबाणी आहे. जीवाश्म इंधन जाळणे तातडीने थांबवून आपल्या ग्रहाला आयसीयूमध्ये हलवण्याची गरज आहे.
प्रगतीचे वारे
सहा वर्षांपूर्वी करण्यात आलेला, हवामान बदलांसंदर्भातील पॅरिस करार म्हणजे हवामानाच्या बदलांमुळे होणाऱ्या प्रभावांना कमी करण्याच्या दिशेने संपूर्ण जगाने उचललेले एक मोठे पाऊल मानले जाते. तेव्हापासून जागतिक नेत्यांनी केलेल्या आणीबाणी संकट बैठका, मोठमोठ्या घोषणा आणि त्याहीपेक्षा मोठी वचने हे सर्व घडून देखील या वास्तविक आणि तात्काळ धोक्याचे निवारण करण्याच्या दिशेने फारशी भरीव कामगिरी झालेली नाही. आणि म्हणूनच आज २०२२ मध्ये पोहोचून देखील आपल्या समोर अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत, कामांचा डोंगर वाढत आहे आणि वेळ मात्र वाळूप्रमाणे भराभर निसटत चालली आहे.
पर्यावरणावर होत असलेला नकारात्मक प्रभाव थांबवण्यासाठी, इतकेच नव्हे तर तो पलटवण्यासाठी व्यवसाय, उद्योगांना पर्यावरणानुकूल संचालन प्रथा आणि कार्बन उत्सर्जनातील घट यांचे पालन करत, सुस्पष्ट आणि भरीव भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे.
वचनबद्धता केवळ शब्द आणि कागदापुरत्या मर्यादीत न राहता, प्रत्यक्षात घडून व दिसून येतील अशा कृती आणि ज्यांचे मोजमाप करता येईल अशा परिणामांमध्ये त्यांचे रूपांतर कसे करता येईल? पर्यावरणाशी निगडित अहवालांमध्ये अधिक जास्त पारदर्शकता आणि ईएसजीशी संबंधित डिस्क्लोजर्स करणे अनिवार्य करून याची सुरुवात केली जाऊ शकते. हवामान, पाणी आणि जंगले यासाठी सीडीपी डिस्क्लोजर्स हे एक चांगले उदाहरण आहे. ईएसजी कामगिरीचे मानदंड ठरवण्यासाठी, मोजमाप करण्यासाठी आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जगभरातील कंपन्या वापरू शकतील असा हा एक सर्वात तटस्थ आणि संपूर्ण जगभरात स्वीकारला गेलेला प्लॅटफॉर्म असून सदैव मोजमाप करता येईल अशा सुधारणा चक्रामार्फत आपल्या ग्रहाला वाचवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट योगदानाला यामध्ये प्रमाणित देखील करता येते. थोडक्यात सांगायचे तर, ‘बोले तैसा चाले’ कंपन्या नेमक्या कोणकोणत्या आहेत हे यामध्ये स्पष्टपणे दिसून येते. आमच्या स्वतःच्या अनुभवांवरून आम्ही सांगू शकतो की, आम्हाला जो प्रभाव घडवून आणायचा आहे त्यासाठी नेमकी दिशा कोणती घ्यावी आणि किती उंची गाठावी हे ओळखण्यासाठी आमच्या सर्वात महत्त्वाच्या संसाधनांमध्ये याचा समावेश आहे.
फक्त कॉर्पोरेट्सच नाही तर गुंतवणूकदार देखील कंपन्यांकडून अधिक मजबूत ईएसजी संरचना, धोरणे, उपक्रम आणि कृतींची मागणी करत आहेत. मजबूत ईएसजी तत्त्वे धोका मुळापासून कमी करतात आणि कंपन्यांना भविष्यासाठी तयार करतात ते का हे समजून घेणे तितकेसे कठीण नाही आणि गेल्या दशकभरात ईएसजीवरील भर व लाभदायकता यामध्ये थेट सहसंबंध असल्याचे डो जोन्स सस्टेनेबिलिटी इंडेक्स आणि मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनल यासारख्या सूचकांकांवर दिसून आले आहे. त्यामुळे पर्यावरणपूरकतेबाबत अहवालाला इतके महत्त्व प्राप्त झाले आहे ही काही आश्चर्याची बाब नाही. एसअँडपी ५०० पैकी जवळपास ९०% कंपन्यांनी २०१९ मध्ये आपले पर्यावरणपूरकता अहवाल प्रकाशित केले. २०११ मध्ये हे प्रमाण फक्त २०% होते.
उद्योगव्यवसायांनी स्वतः स्वतःचे अहवाल सादर करणे हेच मुळात एक चांगले चिन्ह असले तरी पर्यावरणपूरकता निकषांच्या पालनाबाबत पारदर्शक अहवाल सादर केले जावेत यासाठी संस्थात्मक यंत्रणा असणे ही आता काळाची गरज बनली आहे. २०२१ मध्ये सेबीने व्यवसायांची जबाबदारी आणि पर्यावरणपूरकतेच्या अहवालाविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ईएसजी अहवालांच्या कक्षा अधिक रुंद आणि अधिक खोल करणारे, अगदी योग्य वेळी उचलले गेलेले असे हे नियामक पाऊल होते.
महत्त्वाच्या कृतींबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या एका दशकभरात, मोठ्या कंपन्यांनी नेट झीरो उद्दिष्टाच्या दिशेने पुढे जाण्यात खरोखरीच चांगली कामगिरी बजावली आहे. ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करून आणि कार्बन पृथक्करणाचा उपयोग करून ऑफसेटिंग उपाययोजना लागू केल्याने बदल घडून आला आहे. पण अजूनही खूप काही करण्याची गरज आहे. पुढील काही दशकांमध्ये जागतिक तापमानातील वाढ १.५ अंश किंवा त्यापेक्षा कमी राखली जावी यासाठी नवीन विज्ञानावर आधारित उद्दिष्ट उपक्रमाला अनुसरून उत्सर्जनात घट करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. आशावादाला अजूनही वाव आहे कारण गोदरेजसह बहुतांश मोठ्या कंपन्या एसबीटीसाठी साइन अप करत आहेत, पण मध्यम आणि लघु व्यवसायांसाठी ही प्रमाणीकरणाची तपशीलवार प्रक्रिया आहे ज्यामध्ये माहिती, वेळ आणि संसाधने गरजेची आहेत, हे सर्व खूप महाग आहे आणि सहजासहजी उपलब्ध नाही. त्यामुळे निवारणाचे प्रयत्न आता जास्त जोमाने करायला हवेत, इतकेच नव्हे तर महत्त्वाची बाब म्हणजे त्याची निकड लक्षात घेतली पाहिजे, आर्थिक शृंखलेतील सर्वांचा त्यामध्ये सहभाग देखील असायला हवा.
एकजुटीने काम
ऊर्जेच्या जीवाश्म इंधन स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून गेली अनेक दशके तथाकथित ‘ब्राऊन ग्रोथ’ करत असलेल्या अधिक विकसित देशांनी शुद्ध ऊर्जेच्या स्रोतांकडे वळण्याची वाट पाहणे आता भारताला परवडण्यासारखे नाही. आपण या क्षेत्रात आपली वाटचाल वेगवान केली पाहिजे, अधिक आधुनिक दृष्टिकोन बाळगले पाहिजेत आणि किफायतशीर व सहज उपलब्ध असलेल्या शुद्ध ऊर्जा पर्यायांचा उपयोग करून घेतला पाहिजे.
त्याबरोबरीनेच ‘हरित वृद्धी’च्या बाबतीत काहीच तडजोड केली जाणार नाही याची दक्षता सरकारी धोरणांमार्फत घेतली गेली पाहिजे, केंद्र सरकार व राज्यांमध्ये अधिक सातत्यपूर्ण व संरेखित दृष्टिकोन बाळगला गेला पाहिजे. धोरणात्मक पातळीवर अशा प्रकारचे बदल घडवून आणण्याचा वेग खूप जास्त असणे आवश्यक आहे. पर्यावरणपूरक संचालन पद्धती व प्रथांचा स्वीकार करण्यासाठी सुरुवातीला व्यवसाय-उद्योगांना प्रोत्साहनपर लाभ देणे आणि नंतर तसे न केल्यास दंड करणे अशा उपाययोजनांवर विचार केला गेला पाहिजे.
ज्यांच्याकडे संसाधने व माहिती आहे अशा मोठ्या कंपन्या हरित संचालन आणि अहवालामध्ये आघाडीवर आहेत, त्या पुढाकार घेऊन आपल्या पुरवठा शृंखलेचा भाग असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसायांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आवश्यक नियम व प्रक्रियांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मदत करू शकतात व पर्यावरणपूरक संचालनामध्ये सर्वात आधुनिक पद्धतींच्या प्रवाहात त्यांना आणू शकतील.
पर्यावरणपूरक उपभोगाला प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेकडे कंपन्यांना पुन्हा एकवार पाहावे लागेल आणि यासाठी त्यांना आजवर योग्य ठरलेल्या पारंपरिक व्यवसाय धोरणाविरोधात जावे लागू शकते. पण एक गोष्ट आता सर्वांनाच ठाऊक आहे की, पुढे जात असताना मर्यादित नैसर्गिक संसाधनांचा उपयोग आणि संवर्धन यांना अनुसरून उपभोग असणे अनिवार्य ठरणार आहे. त्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या आघाडीच्या ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या उपभोगाच्या सवयींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी अधिक जास्त जागरूक व जबाबदार कसे होता येईल हे शिकवावे लागेल.
आपल्या हातातून वेळ निसटत चालली आहे असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. हवामानात होत असलेले बदल आणि त्यांचे भयानक परिणाम यामधून कोणाचीच सुटका होणार नाही, जगाच्या कोणत्याही भागात तुम्ही असाल किंवा कोणतेही काम करत असाल, तरी तुम्हाला ते भोगावे लागेल. या एका बाबतीत तर आपण सर्वजण नक्कीच एकत्र असणार आहोत. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांना देखील सीमा कळत नाहीत. त्यामुळे देशादेशांतील राजकीय मतभेद बाजूला ठेवून जे योग्य आहे ते सर्वांनी मिळून करणे हेच महत्त्वाचे आहे.