वन्य प्राणी व मानवाच्या सहजीवनासाठी अधिक प्रयत्न आवश्यक : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे डॉ. विनया जंगले, पशुवैद्यकीय व वन्यजीव तज्ञ, यांचा सत्कार
मुंबई: २८ जानेवारी: आधुनिक भारत हा तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा विकास आणि प्राचीन व सम्यक संस्कृती यांचा एक सुंदर मिलाफ आहे. या विकासपर्वात शाश्वत प्रगती व वन्यजीव संरक्षण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याचा पुरस्कार आपल्या संस्कृतीने नेहेमीच केला आहे. क्षमता विकास, प्रशिक्षण व सामाजिक संशोधन या क्षेत्रांत १९८२ पासून कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने कायमच दिशादर्शक चर्चा व विचारमंथन यांना प्रोत्साहन दिले आहे. याच परंपरेला धरून आज डॉ. विनया जंगले, ज्येष्ठ पशुवैद्यकीय व वन्यजीव तज्ञ, यांच्याशी परस्परसंवाद व त्यांच्या निसर्ग संवर्धनातील महत्त्वपूर्ण कार्याबद्दल सत्कार असा कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेच्या ठाणे जिल्ह्यातील उत्तनमधील निसर्गरम्य अशा ज्ञान नैपुण्य केंद्रात हा छोटेखानी सोहळा संपन्न झाला.
माणसाने वन्य प्राणी व त्यांचा अधिवास समजून घेतला पाहिजे
पर्यावरण रक्षणाबद्दल जागृती, तसेच रंजक माहितीतून प्रेरणा घेणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. शहरीकरण व पायाभूत सुविधा वाढताना नागरी माणूस वन्य प्राण्यांच्या जास्त संपर्कात येत असल्याने हे अधिक महत्त्वाचे झाले आहे. उपस्थित असलेले प्रबोधिनीचे प्रशिक्षक, संशोधक व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना डॉ. जंगले यांनी वन्य प्राण्यांची सुश्रुषा व अभ्यास करताना आलेले समृद्ध अनुभव सांगितले. त्यांच्या सादरीकरणात डॉ. जंगले म्हणाल्या की बिबट्या, हत्ती व सर्वच वन्य प्राणी संवेदनशील व बुद्धिमान असतात. शांततापूर्ण सहजीवनासाठी निसर्गाप्रति आपणही संवेदनशील होणे आवश्यक आहे. प्राण्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मानवाने अधिवास राखला पाहिजे.
बिबट्यासोबत सहजीवन
वन्यजीव व त्यांचा अधिवास समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी बिबट्याचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या, “बिबट्यासारख्या प्राण्याचे मानव हे भक्ष नाही. नरभक्षक बिबट्या ही दुर्मिळ व आजारपणासारख्या विशिष्ट कारणाने निर्माण होणारी स्थिती आहे. अन्यथा एखाद्या ठिकाणी सामान्यपणे वावरणारा बिबट्या, नवीन प्रदेशाच्या शोधात हिंडणारा तरुण बिबट्या किंवा वाट चुकलेला बिबट्या, त्याला डिवचले नाही, तर काही त्रास देत नाहीत.” यावेळी त्यांनी डहाणू, बोर्डी, मुंबईतील आरे वसाहत, राष्ट्रीय दुग्ध विकास निगम व भांडूप, वसई किल्ला, भिवंडीतील पडघा आणि ठाण्यातील ओवळा येथे मानवी वस्तीत शिरलेले बिबट्ये व त्यांना पकडून रानात पुन्हा मोकळे केल्याच्या चित्तथरारक व बोधप्रद घटना कथन केल्या.
आसपास कचरा न टाकल्यास कुत्रे वाढत नाहीत व बिबट्या भक्ष्याच्या शोधात वस्तीत येण्याचे प्रमाण घटते. बोरीवली राष्ट्रीय उद्यानालगत वन खात्याने केलेल्या प्रबोधनामुळे जागृती निर्माण झाल्याने यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले, ज्याची प्रशंसा जेन गुडॉल यांनीही केली आहे. बिबट्या वस्तीत शिरल्यास काय करावे याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. सिंधुदुर्गमध्ये स्थलांतरित झालेल्या हत्तींना पकडून रानात सोडण्याचे त्यांचे अनुभवही रोचक होते. तद्नंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात सर्वांचे निसर्गाविषयीचे ज्ञान अनेक पटींनी वाढले.
सन्मान संवाद उपक्रम
सन्मान संवाद या उपक्रमाच्या अंतर्गत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी वेळोवेळी विविध क्षेत्रांतील तज्ञांचे असे उत्साहवर्धक परस्परसंवाद व सन्मान आयोजित करीत असते. डॉ. जंगले यांचा शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले सन्मानचिन्ह, शाल, प्रबोधिनीचा चरित्रग्रंथ व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. प्रबोधिनीच्या अनिल पांचाळ व जयवंत शेलार यांच्या समन्वयातून आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून उपस्थितांची निसर्गाशी तोंडओळख झाली, ज्यातून सर्वजण अधिक जवाबदार व निसर्गस्नेही बनण्यासाठी हातभार लागणार आहे.