जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन गंभीर; जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा
रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदुषण नियमन मंडळ यांची जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापक जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उप प्रादेशिक अधिकारी इंदिरा गायकवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे, अभियंता रत्नागिरी नगर परिषद अविनाश भोईर, महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंटचे प्रशांत पटवर्धन, चिपळूण उप प्रादेशिक अधिकारी अजय चव्हाण, पंकज वेल्हाळ उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी जैव वैद्यकीय कचरा नियम 2000 व सुधारित नियम 2016 ची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये शंभर टक्के झाली पाहिजे असे मत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त करुन त्याकरीता काय करावे लागेल याबाबत सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे जैव वैद्यकीय कचऱ्याचा वार्षिक अहवाल सर्व दवाखाने/क्लिनीक यांनी भरणे सक्तीचे असल्याचे सूचना त्यांनी दिल्या व त्याकरीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने सन 2018 चा वार्षिक अहवाल ऑनलाईन भरुन पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली असून संबंधितांनी सन 2018 चा वार्षिक अहवाल ऑनलाईन पध्दतीने सादर करावा असे आवाहन यावेळी केले.
अनेक छोटे क्लिनीक हे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे रजिस्ट्रेशन करत नाहीत तसेच जिल्ह्यातील मे. महाराष्ट्र बायो हायजेनिक मॅनेजमेंट, लोटे, ता. खेड या सामाईक जैव वैद्यकीय प्रकल्पाचे जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीकरीता सदस्यत्व घेत नाहीत. त्या सर्व क्लिनीकनी मंडळाचे प्राधिकार पत्र घ्यावे व कचरा विल्हेवाटीकरीता सामाईक जैव वैद्यकीय प्रकल्प केंद्राचे सदस्यत्व घ्यावे असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. काही हॉस्पीटल सलाईन बाटल्या बेकायदेशीररित्या भंगारवाल्यांना विकत असल्याचे समोर आले परंतु जैव वैद्यकीय कचरा नियम 2000 व सुधारित नियम, 2016 नुसार सलाईन बाटल्या या जैव वैद्यकीय कचरा नियमानुसार 07 नंबरच्या प्रवर्गामध्ये येत असल्याने सामाईक जैव वैद्यकीय केंद्राकडे प्रक्रियेकरीता पाठविणे आवश्यक आहे. जर कोणी हॉस्पीटल/क्लिनीक यांनी बेकायदेशीररित्या सलाईन बाटल्या विकल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सुधारित नियम 2016 अन्वये कारवाई करण्यात येईल. रत्नागिरी नगर पालिकेच्या विनंतीनुसार सॅनिटरी पॅड/नॅपकीन/बेबी/अडल्ट डायपर हे जैव वैद्यकीय कचऱ्यामध्ये अंतर्भूत नसले तरी त्यांच्या विल्हेवाटीकरीता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयाकडून परवानगी घेवून त्याच्यावर प्रक्रिया करावी असे सुचविण्यात आले.