गोदरेज अँड बॉयसची खारफुटी वनांविषयीची वेबसाईट आता मराठीमध्ये देखील उपलब्ध
खारफुटी वनांविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या गोदरेज मॅन्ग्रोव्हस वेबसाईटवरील माहिती आता मराठीतही वाचता येईल.
मुंबई, 13 ऑगस्ट : गोदरेज अँड बॉयसने आपली “गोदरेज मॅन्ग्रोव्हस” वेबसाईट मराठीतून सादर करण्यात आल्याची घोषणा केली आहे. ही अशाप्रकारची महाराष्ट्रातील पहिलीच वेबसाईट आहे. ही वेबसाईट गोदरेज मॅन्ग्रोव्हस आउटरीच प्रोग्रॅमचा भाग आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये खारफुटी वनांचे योगदान किती महत्त्वाचे आहे याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने गोदरेज अँड बॉयसने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
वेबसाईट मराठीतून सादर केली जाण्याबद्दल गोदरेज कन्स्ट्रक्शनच्या एन्व्हायरन्मेंटल सस्टेनेबिलिटीच्या हेड श्रीमती तेजश्री जोशी यांनी सांगितले, “पर्यावरण निरोगी राखण्यासाठी खारफुटी वनांकडून सातत्याने बजावत जात असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी गोदरेज मॅन्ग्रोव्हस ही वेबसाईट मूलभूत साधन म्हणून कार्यरत आहे. या विषयावर जनजागृती करावी आणि त्यांना खारफुटीच्या संरक्षण व संवर्धनात योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गोदरेजमध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. मराठी वेबसाईट सुरु करण्यात आल्यामुळे आम्हाला अशा लोकांपर्यंत देखील पोहोचता येईल ज्यांना आजवर या अत्यावश्यक संसाधनांविषयी माहिती नाही.”
गेल्या काही दशकांमध्ये गोदरेज अँड बॉयसची वेटलँड मॅनेजमेंट सर्विसेस टीम खारफुटी वनांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्रिय आहे. नुकतीच त्यांनी वर्ल्डवाईड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) इंडिया या संस्थेसोबत ‘मॅजिकल मॅन्ग्रोव्हस‘ या अभियानासाठी भागीदारी केली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यांमध्ये खारफुटी वनांच्या संवर्धनासाठी हे अभियान चालवले जाणार आहे. यासाठी वेबिनार्स, माहितीपट दाखवणे, ऑनलाईन प्रश्नमंजुषा, कथाकथन आणि असेच इतर अनेक उपक्रम करण्याची योजना आहे.
हल्लीच्या काळात त्यांनी इतरही अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, त्यांनी सुरु केलेले मॅन्ग्रोव्हस मोबाईल ऍप्लिकेशन ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे, गेल्या वर्षी त्यांनी केटी बगली यांनी लिहिलेले ‘मेनी सिक्रेट्स ऑफ मॅन्ग्रोव्हस‘ लहान मुलांसाठीचे गोष्टींचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आणि मुंबईतील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पोस्टर प्रदर्शने आयोजित करण्यात आली.
मराठी वेबसाईटवर जाण्यासाठी लिंक – http://www.mangroves.godrej.com/Marathi/index.html
‘मॅजिकल मॅन्ग्रोव्हस‘ या अभियानाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा: www.mangroves.godrej.com
गोदरेज खारफुटी
विक्रोळी येथील गोदरेज खारफुटीची वने संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्राच्या पर्यावरणाला आणि जैवविविधतेला असीमित संरक्षण व संवर्धन सेवा देत आहेत. दोन वर्षांच्या संशोधनातून असे आढळले आहे की, गोदरेज खारफुटी जंगलाने कार्बन डायऑक्साईड, जो एक प्रमुख हरितगृह वायू आहे, ९.५ लाख टन इतक्या प्रचंड प्रमाणात रोखून ठेवला आहे. यामुळे तापमान वाढ व हवामान बदल कमी होण्यात मदत होते. तसेच हे जंगल दरवर्षी ६०,००० टन कार्बन साठवून पर्यावरणास व हवेच्या गुणवत्तेस सातत्याने मदत करत आहे. खारफुटी, जमिनीची धूप रोखण्याबरोबरच निसर्गचक्र व पोषकद्रव्य चक्र संभाळून पर्यावरणाचा समतोल राखतात.