रत्नागिरी, (आरकेजी) : राज्याने या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित केले असून रत्नागिरी जिल्हयाला 20 लाख 54 हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आलेले आहे. पर्यावरण सरंक्षणासोबत उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करा असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी यांनी केले.
वन व सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आरे वारे समुद्र किनारा, आरे वारे, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, प्र.जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्यकार्यकारी अधिकारी आंचल गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उपजिल्हाधिकारी रोहयो जयकृष्ण फड, विभागीय वनअधिकारी प्र.मो. बागेवाडे, विभागीय वन अधिकारी चं.ला.धुमाळ, वनपाल राजेश्री किर, नगराध्यक्ष राहूल पंडीत, जि.प. सदस्या साधना साळवी आदि मान्यवर उपस्थित होते.
वायकर म्हणाले प्रदुषण, वाढते तापमान, दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास, ग्लोबल वार्मिंग या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड जितकी महत्वाची आहे, तितकेच महत्वाचे हे वृक्ष जगवणे आहे, वृक्ष संवर्धनासाठी संपूर्ण समाजाने सक्रिय योगदान देणे गरजेचे आहे. निसर्ग संवर्धन ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
जिल्हयात गतवर्षीच्या उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड करण्यात आली असून यावर्षीच्या २० लाख ५४ वृक्ष लागवड उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्ष लागवड करण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच जिल्हयात गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळलागवडीबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुकही केले.
यावेळी जिल्हाधिकारी पद्रीप यांनी सांगितले की गतवर्षी पाच हजार हेक्टर क्षेत्रावर फळलागवड करण्यात आली असून यावर्षी गतवर्षीपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर फळलागवड करण्यात उद्दी्ष्ठ असल्याचे सांगितले. तसेच जिल्हयाला देण्यात आलेला 20 लाख 54 हजार वृक्षलागवडीच्या उद्दीष्टापेक्षा जास्त वृक्षलागवड साध्य करता येईल असेही त्यांनी सांगितले.