बायो-मेडिकल कचऱ्याचे गंभीर दुष्परिणाम ; कोरोनाशी लढताना विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक : रामनाथ वैद्यनाथन
लेखक : रामनाथ वैद्यनाथन, सरव्यवस्थापक, ‘शाश्वत, सुयोग्य आणि हरित’ विभाग, गोदरेज इंडस्ट्रीज
‘कोविड-19’च्या उद्रेकामुळे आपणा सर्वांचे जीवन अक्षरशः थांबले आहे. लोकांना घरात कोडून राहावे लागले आहे, तर रस्तेही कधी नव्हते एवढे ओस पडले आहेत. प्रवास करण्याची अगदी थोडीफार मुभा आता कुठे मिळू लागली आहे आणि आर्थिक व्यवहार किंचित प्रमाणात सुरू होऊ लागले आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील हा विध्वंस आपल्या पिढीने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, असे खचितच म्हणता येईल. या विध्वंसाचे अर्थातच सामाजिक व आर्थिक परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.
हवामानात होत असलेल्या बदलांवर आपले संपूर्ण लक्ष एकवटलेले असताना, गेल्या बऱ्याच काळापासून आपण पाहिली नव्हती अशी एक गोष्ट म्हणजे, हवेचे प्रदूषण नीचांकी पातळीवर आले आहे. आणि याचवेळी साथीच्या रोगाने संपूर्ण विश्वाला ग्रासून टाकीत आपले बळी घेतले आहेत.
‘पीपीई’पासून मोठा धोका
‘कोरोना’च्या उद्रेकाला आळा घालण्याच्या दृष्टीने जगभरातील सर्व सरकारांनी आपापल्या नागरिकांना सर्जिकल मास्क व ग्लोव्हज यांसारखे ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ (पीपीई) परिधान करण्याचा आग्रह केला आहे. काही बहाद्दरांनी तर संपूर्ण शरीर झाकले जाईल असे संरक्षक पोषाख परिधान केलेले आढळते.
आरोग्यसेवा क्षेत्राकडून या पीपीइ पोषाखांना प्रचंड मागणी आहे आणि ती साहजिकच आहे. ‘कोरोना’च्या रुग्णांना प्रत्यक्ष उपचार देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांना पीपीई पोषाख सतत बदलावे लागण्याचे प्रमाण अधिक आहे.
या पीपीई घालण्याच्या उपायाने मोठ्या लोकसंख्येला आणि ‘कोविड’शी लढणाऱ्या योद्ध्यांना सुरक्षित राहता येत असले, तरी त्यामुळे बायो-मेडिकल कचऱ्याचे प्रमाणही प्रचंड वाढत आहे. वाईट म्हणजे, यातील बराच कचरा समुद्रात वाहून चालला आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2018 मधील एका पर्यावरणविषयक अभ्यासातून दिसून आले आहे की, 1.3 कोटी टन इतका प्लास्टिकचा कचरा दरवर्षी समुद्रात ढकलला जात असतो. मे 2019मध्ये हिंदी महासागरातील कोकोज (कीलिंग) या बेटांवर वाहून आलेल्या 41.4 कोटी इतक्या संख्येने वाहून आलेल्या प्लास्टिक वस्तूंमध्ये काही लाख बूट आणि 3 लाख 70 हजार इतके टूथब्रश आढळले होते. ही आकडेवारी भयावह आहे. यामध्ये आताच्या साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या बायो-मेडिकल कचऱ्याची भर पडणार आहे. आताच समुद्राच्या पृष्ठभागावर ‘डिस्पोजेबल मास्क’ व ‘लॅटेक्सचे ग्लोव्हज’ प्रचंड संख्येने तरंगताना दिसत आहेत. यापुढे त्यात किती भर पडेल, याची कल्पनाही करवत नाही.
प्लास्टिकच्या कचऱ्याचे अतिगंभीर संकट
‘कोरोना’चा उद्रेक होण्यापूर्वी भारतात प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची समस्या खूप तीव्र होती. आपण 26 हजार टन इतका प्लास्टिकचा कचरा दररोज निर्माण करीत असतो. त्याव्यतिरिक्त गोळाही केला जात नाही, असा कचरा 10 हजार टनांहून अधिक आहे. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही आकडेवारी आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱे उद्योग 2015 मधील 13.4 दशलक्ष टनांहून (एमटी) वाढून 2020 मध्ये 22 दशलक्ष टनांपर्यंत गेले आहेत, अशी माहिती इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅंड इंडस्ट्रीज या संस्थेने दिली आहे. यातील निम्मे प्लास्टिक ‘सिंगल-यूज’ स्वरुपाचे असते.
आपल्याकडे नियम नसणे ही समस्या नाही. बायो-मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीचे कडक नियम भारतात आहेत. ‘कोरोना’च्या संकटाच्या काळात ‘सीपीसीबी’ने आणखी काही कडक नियम घालून दिले आहेत. बायो-मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने न लावल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्याची जाणीव राष्ट्रीय हरित लवादानेही करून दिलेली आहे.
आपल्याकडे नियमनाची चौकट तयार आहे. प्रश्न आहे तो या नियमांच्या अंमलबजावणीचा.
आपल्या देशात 608 दशलक्ष टन इतका बायो-मेडिकल कचरा दररोज निर्माण होतो. त्यातील 528 दशलक्ष टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते व ‘कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट अॅंड डिस्पोजल फॅसिलिटीज’च्या (सीबीडब्ल्यूटीएफ) माध्यमातून त्याची विल्हेवाट लावली जाते. उरलेल्या कचऱ्याचे काय, हा प्रश्न ‘कोरोना’च्या उद्रेकापूर्वीदेखील उभा राहिला होता. ‘कोरोना’नंतरच्या काळात हा प्रश्न गंभीर बनला असेल, इतकेच या क्षणी म्हणता येईल.
बायो-मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रशुद्ध पद्धतीने लावण्याचे वळण आपल्यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला लावणे अतिशय गरजेचे आहे. ते ‘कोरोना’पूर्वीच्या काळातही आवश्यक होते आणि आता तर त्याची गरज कित्येक पटींनी वाढली आहे.
बायो-मेडिकल कचऱा अयोग्य पद्धतीने, इतस्ततः टाकला, तर त्यामुळे केवळ पर्यावरणाचीच हानी होते असे नाही, तर त्यामुळे रोगाच्या संसर्गाचाही धोका वाढतो.
व्यक्तिगत पातळीवरील प्रयत्न
‘कोरोना’चा व्हायरस कित्येक तास किंवा दिवस जगू शकतो, हे आता आपल्याला माहीत आहे. शास्त्रीयदृष्ट्या ते सिद्धही झाले आहे. ‘पीपीई’चे पोषाख अयोग्य पद्धतीने टाकून दिले, तर त्यापासून कचरावेचक व निर्जंतूकीकरण करणाऱ्यांच्या, तसेच हा कचरा हाताळणाऱ्यांच्या आरोग्यास मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. भारतात अशी कामे करणाऱ्यांना ग्लोव्हज, मास्क किंवा बूट मिळतातच असे नव्हे.
अशा वेळी ही समस्या कशी हाताळायची? कोरोना वाढीचे संकट टाळायचे असेल, तर प्रत्येक नागरिकाने व्यक्तिशः या बाबतीत पुढाकार घ्यायला हवा. बायो-मेडिकल स्वरुपाचा कचराच उत्पन्न होऊ द्यायचा नाही, हा त्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचा रामबाण उपाय आहे. आपण सर्वांनी एकदा वापरून फेकावे लागणाऱ्या ‘मास्क’ व ‘ग्लोव्हज’ऐवजी पुन्हा वापरता येण्याजोगे ‘मास्क’ व ‘ग्लोव्हज’ वापरले, तर ते अधिक चांगले. या पुन्हा वापरण्याजोग्या वस्तूंचा वापर पीपीई म्हणून परिणामकारक असतोच, तसेच त्यांच्या वापराने पर्यावरणाचा बचावही होतो.
आपल्या पृथ्वीवरील ज्या गोष्टी आपण अतिरिक्त प्रमाणात वापरत असतो, त्यांवर नियंत्रण आणण्याची संधी ‘कोरोना’च्या संकटाने आपल्याला दिली आहे. या संधीचा जास्तीत जास्त फायदा आपण घेऊ आणि पर्यावरणाचे आणखी नुकसान होण्यापूर्वीच ते सावरून धरू.