पर्यावरण स्नेही नागरिकांमुळे राज्यात साडेदहा कोटींहून अधिक वृक्षलागवड : मुनगंटीवार
मुंबई : राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या ऑनलाईन माहितीनुसार राज्यात १० कोटी ८५ लाख ९९ हजार १२२ वृक्षलागवड झाली आहे. राज्यातील पर्यावरणस्नेही नागरिकांच्या उत्तम सहभाग आणि सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याचे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आजपर्यत महावृक्षलागवड उपक्रमात २५ लाखांहून अधिक व्यक्ती, संस्थांनी सहभाग घेतल्याची माहिती दिली.
राज्यात आजपर्यंत झालेल्या वृक्षलागवडीमध्ये वन विभागामार्फत ६ कोटी ४२ लाख ०१ हजार ६३४ रोपं लावण्यात आली आहेत. तर वनेतर क्षेत्रातील वृक्षलागवड ३ कोटी ६९ लाख, ८० हजार ११२ इतकी आहे. माय प्लांट या मोबाईल ॲपद्वारे १ लाख ४४ हजार ९३७ रोपं राज्यात लागल्याची नोंद ऑनलाईनपद्धतीने झाली आहे. रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४२ हजार ४१४ रोप लागवड झाल्याची नोंद झाली आहे तर हॅलो फॉरेस्ट १९२६ या वन विभागाच्या हेल्पलाईनवर ९७४३ जणांनी वृक्षलागवड केल्याची नोंद केली आहे.वरील सगळी माहिती ही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाली आहे तर ऑफलाईन पद्धतीने ७० लाख २० हजार २८२ इतकी वृक्षलागवड झाल्याची माहिती वन विभागाकडे प्राप्त झाली आहे.
राज्यात सर्वाधिक वृक्षलागवड नांदेड जिल्ह्यात झाली असून ती ६८ लाख ६४ हजार, ५१४ इतकी आहे. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्याचा नंबर लागतो. येथे ६१ लाख १४ हजार २९७ रोपलागवड झाली आहे. यवतमाळ ५६ लाख ४२ हजार ०४६ वृक्षलागवडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्याक्रमांकावर चंद्रपूर जिल्हा असून येथे ५४ लाख ७९ हजार ४७७ रोपं लावली गेली आहेत. पाचव्या स्थानावर गडचिरोली जिल्हा आहे. येथे ४६ लाख ८८ हजार ६२६ तर औरंगाबाद जिल्ह्यात ४३ लाख ८६ हजार ५१५ वृक्षलागवड झाली आहे. ४० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झालेल्या जिल्ह्यामध्ये नंदूरबार, अहमदनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा नंबर लागतो. येथे अनुक्रमे ४२ लाख ८८ हजार९२५, ४१ लाख ३७ हजार ३५० आणि ४० लाख ७२ हजार ११६ रोपं लागली आहेत.
लातूर, बीड, जळगाव, जालना, पुणे, हिंगोली आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली आहे. सर्वच जिल्ह्यात वृक्षलागवडीचे काम उत्साहात सुरु असून ३१ जुलै २०१८ पर्यंत राज्यात १३ कोटीच्या संकल्पापेक्षा अधिक वृक्षलागवड होईल असा विश्वास ही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.