रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे इथं दोन भावांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या भागात बिबट्याने हल्ला केल्याची पाचवी घटना आहे.
सोमवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास मावळंगे गावातील विक्रांत जाधव (१७) आणि योगेश जाधव (३०) हे व्यायामशाळेत निघाले होते. दुचाकीवरून जात असताना एका वळणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. बिबट्याने हल्ला करताच दोघे गाडीवरून खाली पडले. योगेशच्या पायांवर पहिल्यांदा बिबट्याने झडप टाकली. त्यानंतर योगेशने आरडाओरडा केला. बिबट्याने यानंतर लक्ष्य केलं ते विक्रांतला. विक्रांतच्या पाठीवर त्याने झेप घेतली. आपल्या भावावर हल्ला झाला हे पाहिल्यानंतर योगेशने दुचाकी कशीबशी सुरु केली आणि बिबट्याला बिथरवण्यासाठी दुचाकी त्याच्या अंगावर घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कसाबसा विक्रांत बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर दुचाकीवरून या दोघांनी पळ काढला. मात्र, बिबट्याच्या हल्यात हे दोघे गंभीर जखमी झाले. हे दोघे जाधववाडी मावळंगे इथले रहिवासी आहेत. त्यांच्यावर रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.